सातारा बनतोय महाराष्ट्राचं ‘फ्रूट बास्केट’, जिल्ह्यात तब्बल २९ प्रकारची फळे 

By नितीन काळेल | Published: June 15, 2023 12:23 PM2023-06-15T12:23:54+5:302023-06-15T12:24:16+5:30

अनुकूल वातावरण, जमिनीची सुपिकता असे वैविध्यपूर्ण वातावरण

Satara is becoming the fruit basket of Maharashtra, as many as 29 types of fruits in the district | सातारा बनतोय महाराष्ट्राचं ‘फ्रूट बास्केट’, जिल्ह्यात तब्बल २९ प्रकारची फळे 

सातारा बनतोय महाराष्ट्राचं ‘फ्रूट बास्केट’, जिल्ह्यात तब्बल २९ प्रकारची फळे 

googlenewsNext

सातारा : वातावरण अनुकूल, जमिनीची सुपिकता वेगळी, दुसरीकडे विभागानुसार ३०० ते ५ हजार मिलीमीटरपर्यंत पडणारा पाऊस. अशा वैविध्यपूर्ण वातावरणामुळे जिल्ह्यात ७ हजार हेक्टरवर तब्बल २९ प्रकारची फळे घेण्यात येत आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा महाराष्ट्राचं ‘फ्रूट बास्केट’ म्हणून पुढे येत आहे.

सातारा जिल्ह्याचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. पूर्वेकडील माण, खटाव, फलटण हे तालुके दुष्काळीपट्यात मोडतात. याठिकाणी ३०० ते ४०० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो. तर पश्चिमेकडील सातारा, जावळी, पाटण, महाबळेश्वर या भागात पाऊस अधिक असतो. महाबळेश्वर, कोयनानगर येथे तर जून ते सप्टेंबर दरम्यान ५ हजार मिलीमीटरच्या वर पर्जन्यमान होते. जिल्ह्यात अशी भाैगोलिकता आहे. त्यामुळे विविध भागात वेगवेगळी पिके घेण्यात येतात. तसेच फळबागाही घेतल्या जातात. सध्या जिल्ह्यात २९ प्रकारची फळे घेण्यात येतात एेवढे वैविध्य जिल्ह्यात आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक फळबागांचे क्षेत्र डाळिंबाचे आहे. त्यानंतर इतर फळे घेण्यात येतात. यातील काही फळे कमी पाऊस पडणाऱ्या भागात होतात. तर काही फळांना पाऊस तसेच हवामान आवश्यक असते. अनुकूल हवामानानुसार फळबागा घेतल्या जातात. या फळबागांतून शेतकरी मालामाल होऊ लागले आहेत. यातूनच महाबळेश्वर तालुक्यात स्ट्राॅबेरी पर्यटन सुरू झाले. तर दुष्काळी भागात कृषी पर्यटनाला गती मिळाली आहे. परिणामी बळीराजासाठी हे आशादायकच वातावरण निर्माण झालेले आहे.

फळबागांचे होणारे फायदे...

  • फळपिकांत आंतरपीक घेता येते.
  • कमी पाण्यातही फळबागा घेणे शक्य होते.
  • शास्वत उत्पन्नाचा पर्याय निर्माण.
  • पर्यटनाच्या माध्यमातून अऱ्थार्जन होऊ शकते.
  • रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यास मदत.
  • दुष्काळी तालुक्यात पर्यटन. एकाच ठिकाणी अनेक फळबागा.
  • पर्यटन व्यवसायातून फळांची विक्री.
  • फळांवर प्रक्रिया उद्योग झाल्यास रोजगार वाढणार.


जिल्ह्यातील २९ फळे आणि क्षेत्र...
फळे - लागवाड (हेक्टरमध्ये)

द्राक्ष               ६१८
डाळिंब           १,६५८
आंबा             १,४८६
काजू             १४.७०
सीताफळ      ६४८
पेरू               ३९०
कागदी लिंबू  ६८
चिकू             २२७
नारळ            १५१
बोर               २६
आवळा         ४२
जांभूळ          २६
फणस           २०
चिंच              ८२
अंजीर           १९
संत्री              ०२
मोसंबी         ०४
सफरचंद      ०३
केळी            २७५
पपई              ५५
ड्रॅगनफ्रूट      ४८
स्ट्राॅबेरी     १,०३७
कलिंगड     ८१
टरबूज        १८
रासबेरी       १०
गुजबेरी       १०
ब्लूबेरी        ०१
मलबेरी       २२
खूजर           - -

तालुकानिहाय बागांचे क्षेत्र हेक्टरमध्ये
सातारा              १६६
काेरेगाव           २७३
खटाव              १,१५३
कऱ्हाड            ३०८
पाटण              १७७
वाई                 १६६
जावळी           १९७
खंडाळा          २००
महाबळेश्वर    १५९
फलटण          १,७८०
माण               १,५५०

सातारा जिल्ह्यात फळबागांसाठी चांगले हवामान आहे. वेगवेगळ्या वातावरणात तब्बल २९ फळे घेतली जात आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा हा महाराष्ट्राचं ‘फ्रूट बास्केट’ म्हणून पुढे येत आहे. यामधून शेतकऱ्यांना शास्वत उत्पन्नाचा मार्ग निर्माण झालेला आहे. तसेच कृषी विभागाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन योजनांचा लाभ दिला जातो. पुढील दोन वर्षांत जिल्ह्यात फळक्षेत्र आणि उत्पादनात वाढचा निर्धार करण्यात आलेला आहे. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Satara is becoming the fruit basket of Maharashtra, as many as 29 types of fruits in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.