सातारा महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू, जिल्ह्याने दिले चार मुख्यमंत्री अन् वीसपेक्षा जास्त महत्वाच्या खात्यांचे मंत्री
By दीपक शिंदे | Published: October 22, 2024 03:28 PM2024-10-22T15:28:21+5:302024-10-22T15:28:49+5:30
दीपक शिंदे सातारा जिल्ह्याने सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे सातारा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू आहे. दिवंगत यशवंतराव ...
दीपक शिंदे
सातारा जिल्ह्याने सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे सातारा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण आणि एकनाथ शिंदे असे चार मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला दिले. संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते दिल्लीहून महाराष्ट्रात आणण्यात आला आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली. यशवंतराव चव्हाणांच्या नावाने आणि त्यांच्या विचारानेच साताऱ्याची ओळख झाली. आजही महाराष्ट्राला यशवंत विचारांची गरज आहे. असाच प्रचार निवडणुकीतून झाल्याचे पहायला मिळते. सहाजिकच जिल्ह्यावर पूर्वीपासून काँग्रेसचा पगडा राहिला.
सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण, किसन वीर, बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, प्रतापराव भोसले, लक्ष्मणराव पाटील, विलासकाका उंडाळकर यांनी सहकाराचे जाळे विणले. सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, दूध संघ, सहकारी सोसायट्या यामुळे शेतकरी या सहकाराशी जोडला गेला आणि एकरुप झाला. सहकारातून शेतकऱ्यांचा विकास होत गेला आणि भविष्यात या सहकारी संस्था ज्यांच्या ताब्यात राहतील त्यांचेच जिल्ह्यावर नेतृत्व प्रस्थापित होत गेले. जिल्हा बँक ही राजकारणाचा केंद्रबिंदू राहिली.
साताऱ्यात भोसले घराणे, फलटणमध्ये निंबाळकर घराणे, कऱ्हाडमध्ये यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, पी. डी. पाटील, विलासराव पाटील उंडाळकर या दिग्गजांनी प्रतिनिधीत्व केले. वाईमध्ये प्रतापराव भोसले, मदनराव पिसाळ, कोरेगावमध्ये शंकरराव जगताप, शालिनीताई पाटील, माण मतदारसंघात लोकप्रतिनिधी बदलत राहिले तरी प्रभाव मात्र राष्ट्रीय काँग्रेसचाच राहिला. तर पाटणमध्ये देसाई आणि पाटणकर या दोनच गटांची सत्ता राहिली.
सातारा जिल्ह्यात सातारा, फलटण आणि पाटण याठिकाणी राजघराणे आणि सरकारांच्या ताब्यात सत्ता राहिली. इतर ठिकाणी मात्र, सत्तेचे विक्रेंद्रीकरण होत गेले. काँग्रेस, जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस असा सातारा जिल्ह्यातील राजकारणाचा प्रवास होत राहिला. त्यानंतर आता भाजपने जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या भाजपकडे दोन, शिवसेनेकडे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार १, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि एक जागा काँग्रेसकडे आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून भाजपला विधानसभेसाठी तर लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून खासदारकीसाठी प्रवेश करता आला.
यशवंतराव चव्हाण यांनी जिल्ह्यासह राज्याचा विचार केला. देशाच्या जडणघडणीतही त्यांनी योगदान दिले. नंतरच्या काळात मात्र, आपापले मतदारसंघ जपण्यातच नेत्यांची शक्ती खर्च झाली. आपण निवडून येणार की नाही याच विवंचनेत पाच वर्षे असलेल्या लोकप्रतिनिधींना मतदारसंघाबाहेर काही दिसलेच नाही. काहींना तर निधी कसा आणावा आणि कसा खर्च करावा याचीही अडचण झाली.
सातारा विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीपासून राष्ट्रीय काँग्रेसचा प्रभाव राहिला. सुरुवातीला १९६२ ते ७२ या कालावधीत धोंडीराम जगताप यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर १९७८ ते ९९ या काळात १९९८ चा अपवाद वगळता अभयसिंहराजे भोसले यांनी सुमारे २० वर्षे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी राज्याचे सहकारमंत्री म्हणूनही काम केले. त्यानंतर मागील २००४ ते २०२४ असे २० वर्षे त्यांचे पुत्र शिवेंद्रसिहराजे भोसले या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. सुरुवातीचा दहा वर्षांचा काळ सोडला तर या मतदारसंघावर राजे घराण्याचेच वर्चस्व राहिले आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघही राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला होता. देसाई आणि पाटणकर यांचीच याठिकाणी सत्ता होती. १९५१ ते १९८० अशी सुमारे ३० वर्षे दौलतराव ऊर्फ बाळासाहेब देसाई यांनी या तालुक्याचा कारभार एकहाती सांभाळला. राज्याच्या पहिल्या मंत्रीमंडळात शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. गृहमंत्री, शिक्षणमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. तर त्यांच्यानंतर विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटणची जबादारी स्वीकारली त्यांनीही सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात काम केले. तर सध्या बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असून हा मतदारसं काँग्रेस, जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा प्रभाव दाखवत आला आहे.
कऱ्हाड दक्षिण हा १९५१ पासून आजतागायत काँग्रेसच्या ताब्यात असलेला जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून यशवंतराव मोहिते यांनी २७ वर्षे तर विलासराव मोहिते यांनी १९६७ ते २०१४ असे जवळपास ४७ वर्षे प्रतिनिधीत्व केले. सर्वाधिक दहा वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले होते. सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.
कऱ्हाड उत्तर हा काँग्रेसच्या प्रभावाखालील मतदारसंघ. यशवंतराव चव्हाण यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर बाबूराव कोटवार, केशवराव पवार, पी. डी. पाटील, जनार्दन अष्टेकर आणि १९९५ पासून शामराव उर्फ बाळासाहेब पाटील हे नेतृत्व करत आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचा आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे.
माण विधानसभा मतदारसंघावरही काँग्रेसचा प्रभाव होता. याठिकाणी लोकप्रतिनिधी बदलले तरी पक्ष एकच राहिला. सध्या या मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे प्रतिनिधीत्व करत आहेत. सुरुवातीला राखीव असलेला हा मतदारसंघ मतदारसंघाच्या पुर्नरचनेनंतर खुला झाला आहे. काँग्रेस ते भाजप असा या मतदारसंघाचा प्रवास राहिला.
कोरेगाव मतदारसंग पूर्वीपासूनच काँग्रेसच्या विचाराचा होता. याठिकाणी शंकरराव घार्गे यांनी सुरुवातीला प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर शंकरराव जगताप यांनी पाचवेळा याठिकाणाहून निवडून गेले. तर जिल्ह्यात एकमेव महिला आमदार शालिनीताई पाटील या देखील याच मतदारसंघातून दोनवेळा निवडून विधानसभेवर गेल्या होत्या. शंकरराव जगताप हे विधानसभेचे अध्यक्ष आणि संसदीय कायद्याचे अभ्यासक म्हणून परिचित होते. तर शालिनीताई पाटील यांनी महसूलमंत्री म्हणून काम केले होते. त्यांच्यानंतर शशिकांत शिंदे यांनी दोनवेळा राष्ट्रवादीकडून तर सध्या महेश शिंदे हे शिवसेनेकडून प्रतिनिधीत्व करत आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी ते शिवसेना असा या मतदारसंघाचा प्रवास झाला आहे.
वाई मतदारसंघ हा जिल्ह्यातील आकाराने सर्वात मोठा मतदारसंघ. या मतदारसंघावरही काँग्रेसचाच प्रभाव राहिला आहे. दादासाहेब जगताप यांनी सुरुवातीला या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर प्रतापराव भोसले यांनी चारवेळा आणि मदनराव पिसाळ यांनी सर्वाधिक पाचवेळी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. प्रतापराव भोसले यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती. सध्या मकरंद पाटील हे राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.
फलटण विधानसभा मतदारसंघ हा नाईक निंबाळकर घराण्याकडे राहिला आहे. मालोजीराजे निंबाळकर यांनी सुरुवातीस काँग्रेसच्या माध्यमातून या मतदारसंघावर वर्चस्व मिळविले. तर त्यानंतर १९८० ते १९९० या काळात सुर्याजीराव ऊर्फ चिमणराव कदम यांनी नेतृत्व केले. त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी पंधरा वर्षे या मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारली.
जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांवर काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे.अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता या मतदारसंघांवर राहिली. सुमारे ५० वर्षानंतर या सत्तेत बदल झाले आणि ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर आता शिवसेना आणि भाजपने यामध्ये आपले स्थान मिळविले आहे.