Satara: जयंत पाटील यांनी घेतली मदन भोसले यांची भेट, दोन्ही नेत्यात दीड तास चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 04:36 PM2024-08-25T16:36:13+5:302024-08-25T16:37:52+5:30
Satara: आगामी विधानसभेच्या निवडणुकीने पार्श्वभूमीवर मदन भोसले यांच्यावर कार्यकर्त्यांकडून वेगळी भूमिका घेण्याचा दबाव येत असताना या भेटीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून मदन भोसले हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
- दीपक देशमुख
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी भाजपचे नेते माजी आमदार मदन भोसले यांची सातारा निवासस्थानी भेट घेतली. आगामी विधानसभेच्या निवडणुकीने पार्श्वभूमीवर मदन भोसले यांच्यावर कार्यकर्त्यांकडून वेगळी भूमिका घेण्याचा दबाव येत असताना या भेटीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून मदन भोसले हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
कार्यकर्त्यांकडूनही मदन भोसले यांना वेगळी भूमिका घेण्याबाबत सातत्याने आग्रह होत आहे. यामुळे मदन भोसले यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी वाई महाबळेश्वर आणि खंडाळा तालुक्याच्या दौरा सुरू केला आहे. दरम्यान रविवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी मदन भोसले यांची सातारा निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दीड तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली. याबाबत मदन भोसले यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी जयंत पाटील यांच्यासमवेत मित्रत्वाचे संबंध आहेत. फक्त सदिच्छा भेट असून ते विचारपूस करण्यास आले असल्याचे सांगितले. मात्र, दोन राजकीय नेते सुमारे दीड तास चर्चा करतात, त्यावेळी राजकारणाविषयी कोणती चर्चा तर झाली याबाबत अधिक भाष्य करण्याचे मदन भोसले यांनी टाळले.
वाई मतदार संघातील कार्यकर्त्यांकडून आगामी विधानसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारीची मागणी होणार असल्याने आणि विद्यमान आमदार त्यांचा असल्याने माझ्या कार्यकर्त्यांकडून वेगळी भूमिका घेण्याबाबत सातत्याने आग्रह होत असल्याचे भोसले यांनी सांगितले. तथापि, आपण या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला नसून राष्ट्रवादी पक्षांकडूनही कोणी संपर्क साधला नसल्याचे त्यांनी सांगितले. जगातील तीनही तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन निर्णय घेऊन पुढील निर्णय घेणार आहे, असे भोसले यांनी सांगितले.
यशवंतरावांचे मानसपुत्र काय भूमिका घेणार?
यशवंतराव चव्हाण यांचे खंदे सहकारी म्हणून दिवंगत प्रतापराव भोसले यांचे नाव घेतले जाते तर शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र. मदन भोसले यांच्याबाबत मानसपुत्र कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.
वाईत राजकीय समीकरण बदलांचे संकेत
आमदार मकरंद पाटील अजितदादा गटामध्ये गेल्यामुळे वाई मतदासंघात शरद पवार गटामध्ये राजकीय पोकळी निर्माण झालीय. मदन भोसले यांना सोबत घेऊन पोकळी भरून निघू शकते, याची चर्चा मतदासंघांत आहे.