सातारा : सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी जयवंत शेलारांना संधी-पुन्हा खांदेपालट : हर्षद कदम यांची गच्छंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:02 PM2018-12-19T22:02:12+5:302018-12-19T22:02:24+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत खांदेपालट केली आहे. कºहाड व पाटण तालुक्याची जबाबदारी असणारे हर्षद कदम यांची गच्छंती करण्यात आली असून, त्यांच्या जागी जयवंत शेलार यांची नियुक्ती
सातारा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत खांदेपालट केली आहे. कºहाड व पाटण तालुक्याची जबाबदारी असणारे हर्षद कदम यांची गच्छंती करण्यात आली असून, त्यांच्या जागी जयवंत शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मातोश्रीवरुन नुकतेच आदेश निघाले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा व सांगली जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात तीन जिल्हाप्रमुख आहेत. सातारा, वाई व कोरेगाव या तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी राजेंद्र कुंभारदरे यांच्याकडे देण्यात आली आहे. चंद्रकांत जाधव यांच्याकडे फलटण व माण विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे.
हर्षद कदम हे पाटण व कºहाड दक्षिण, कºहाड उत्तर मतदारसंघाचे काम पाहत होते. त्यांच्या जागी जयवंत शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हाप्रमुख म्हणून सचिन मोहिते (सातारा-जावळी विधानसभा), विठ्ठल गायकवाड (फलटण विधानसभा), सुनील पाटील (कºहाड उत्तर), प्रदीप झणझणे (फलटण). रणजितसिंह कदम (फलटण शहर प्रमुख), अविनाश फडतरे (तालुका संघटक उत्तर कोरेगाव), गणेश उत्तेकर (महाबळेश्वर तालुका), अनिल पवार (खटाव तालुका), सचिन भिसे (क्षेत्र प्रमुख, माण-खटाव) आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, हर्षद कदम यांच्या गच्छंतीबाबत करण्याचे निश्चित कारण काय? याबाबत पत्रकारांनी पक्षाचे संपर्क नेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष नितीन बानगुडे-पाटील यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष प्रमुखांनी हे फेरबदल केले आहेत.’
आमदारांशी सूत जुळलेच नाही
पाटणचे आमदार शंभूराज देसाई व तत्कालीन जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्यात वारंवार खटके उडत होते. देसाई-कदम यांचे सूत जुळले नसल्याने वादाच्या ठिणग्या पडत होत्या. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पाटणमधील तीन गटांत हर्षद कदम यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्या उमेदवारांना आव्हान दिले होते. कदमांची राजकीय महत्त्वाकांक्षा देसाई गटाला वारंवार आव्हान देत होती. त्यातूनच कदमांची गच्छंती झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.