सातारा : जिंतीमध्ये शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार, डोक्याला गंभीर इजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:31 PM2018-03-05T13:31:46+5:302018-03-05T13:31:46+5:30
कूपनलिकेची वायर कोणीतरी तोडली? हे सांगितल्याचा राग डोक्यात ठेवून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये संबंधित शेतकऱ्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. सदाशिव सखाराम रणवरे असे जखमीचे नाव आहे. जखमीला फलटण येथे प्राथमिक उपचार करून पुण्याला हलविले आहे.
जिंती (सातारा) : कूपनलिकेची वायर कोणीतरी तोडली? हे सांगितल्याचा राग डोक्यात ठेवून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये संबंधित शेतकऱ्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. सदाशिव सखाराम रणवरे असे जखमीचे नाव आहे. जखमीला फलटण येथे प्राथमिक उपचार करून पुण्याला हलविले आहे.
सदाशिव रणवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वमालकीची जमीन गट नंबर ५३८ मध्ये कूपनलिका आहे. ते सुरू करायला गेले असता मोटार सुरू झाली नाही. त्यावेळी पाहणी केली असता सर्व्हिस वायर तुटलेली आढळून आली, ही बाब तेथून निघालेल्या भावकीतील लोकांना सांगितली.
त्यावेळी शेजारी राहत असलेले समीर बाबासाहेब रणवरे हा हातात कुऱ्हाड घेऊन तेथे आला. त्या पाठोपाठ त्याची आई शीलाबाई, वडील बाबासाहेब व पत्नी अश्विनी तेथे आल्या. समीरने वायर कट केली म्हणून माझे नाव का घेतोस? असे विचारले. तेव्हा मी तुझे नाव घेत नाही, वायर तुटल्याचे मी लोकांना दाखवतोय, असे सदाशिव रणवरे यांनी त्यास सांगितले.
यावेळी समीरने चिडून शिवीगाळ करत हाताने ढकलले. त्यावेळी सदाशिव रणवरे खाली गवतावर पडले. त्यावेळी समीरने कुऱ्हाडीचे तुंब्याने सदाशिव यांच्या उजव्या पायावर मारले. पुन्हा समीरने तुला खल्लासच करतो, असे म्हणून कुऱ्हाडीने डोक्यावर वार केला. डोक्यातूनही रक्त वाहू लागले. त्यावेळी बाबासाहेब रणवरे, शीलाबाई रणवरे, अश्विनी रणवरे यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.
घटनादरम्यान, सदाशिव रणवरे यांची चुलती सुमन विनायक रणवरे व भाचा भैया मोहिते तेथे आले. त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक त्याठिकाणी आले. त्यांनी उपचाराकरिता सदाशिव रणवरे यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून फलटणच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.