सातारा : तीर्थक्षेत्र चाफळ येथील सीतामाईची यात्रा उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:46 PM2019-01-15T13:46:51+5:302019-01-15T13:48:47+5:30
तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेल्या चाफळ, ता. पाटण येथील श्रीराम मंदिरात मंगळवारी सीतामाईची यात्रा हजारो महिला भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तीन दशकांची परंपरा लाभलेल्या या उत्सवादरम्यान हजारो सुवासिनी महिलांनी मकर संक्रांतीचा हळदी-कुंकू व तिळगुळाचा अखंड सौभाग्याचा वसा घेतला.
चाफळ : तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेल्या चाफळ, ता. पाटण येथील श्रीराम मंदिरात मंगळवारी सीतामाईची यात्रा हजारो महिला भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तीन दशकांची परंपरा लाभलेल्या या उत्सवादरम्यान हजारो सुवासिनी महिलांनी मकर संक्रांतीचा हळदी-कुंकू व तिळगुळाचा अखंड सौभाग्याचा वसा घेतला.
चाफळच्या या श्रीराम मंदिरात १९८५ पासून सीतामाईची यात्रा भरत असते. संक्रांतीला सीतामाईचे दर्शन घेऊन वसा घेतल्यास सौभाग्य अखंड टिकते, अशी भावना महिलांमध्ये वाढीला लागल्याने याठिकाणी दरवर्षी महिलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी सकाळपासूनच महिलांंनी मंदिर आवारात गर्दी केली होती. दुपारी एकनंतर महिलांच्या गर्दीत वाढ झाल्याने महिला मिळेल त्याठिकाणी विडे मांडून पूजा करत होत्या.
तिळ नव्हे हलवा, येता जाता बोलवा, तिळगूळ घ्या गोड गोड बोला, वसा घ्या वसा, अखंड सौभाग्याचा वसा, अशा एक ना अनेक भावपूर्ण संदेशांनी मंदिर परिसर दणाणून गेला. यावेळी वसा घेत असताना महिला सुगडीमध्ये तिळगूळ, बोरे, ऊस, शेंगा, हरभरा, पावटा, हळदी, कुंकू घेऊन श्रद्धापूर्वक सीतामाईच्या साक्षीने खाऊच्या पानावर खोबरे, खारिक, सुपारी ठेवून पाच सौभाग्यवतींच्या हातून ओटीत घालत होत्या.
दक्षिण महाराष्ट्रासह असंख्य भाविकांबरोबर परदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या तीर्थक्षेत्र चाफळच्या श्रीराम मंदिरास २०११ मध्ये राज्य शासनाच्या पर्यटन खात्याचे मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी या तीर्थक्षेत्रास पर्यटनस्थळाचा ह्यबह्ण वर्ग दर्जा देऊन शासन दरबारी नोंद केली आहे. तर मंदिराची देखभाल येथील श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून पाहिली जाते.
उत्सवादरम्यान येथे येणाऱ्या महिलांना सीतामाईचे दर्शन व्यवस्थित घेता यावे, यासाठी दोरीने बॅरिकेटस तयार करून ओळीने रांगेत सोडण्यात येत होते. पार्किंगची व्यवस्था मंदिरापाठीमागील शेतासह समर्थ विद्यामंदिर ग्राऊंड व प्राथमिक आरोग्य केंद्र्रात करण्यात आली होती. तर येथील समर्थ विद्या मंदिरातील आरएसपीचे बालसैनिक महिलांना रांगेतून दर्शनास सोडण्यासाठी अथक परिश्रम घेत होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र्राचे नूतन वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथक तैनात करण्यात आले होते. तर एसटी महामंडळाच्या विविध आगारातून महिला प्रवाशांच्या सेवेसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या.
ट्रस्टमार्फत भाविकांना इतर सोयीसुविधा पुरवण्यासाठी ट्रस्टचे विश्वस्त अनिल साळुंखे, चंद्रकांत पाटील, व्यवस्थापक बा. मा. सुतार, सरपंच अलका पाटील, उपसरपंच उमेश पवार, ग्रामसेवक राजेंद्र चोरगे आदी अथक परिश्रम घेत होते. यात्रेदरम्यान कोतणाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.