सातारा : कण्हेर धरणातून पाणी सोडण्याने किडगाव-हमजाबाद पूल पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:49 PM2018-08-28T13:49:57+5:302018-08-28T13:52:43+5:30
कण्हेर धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून, पाणीसाठा नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून वेण्णा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी किडगाव व हमजाबाद या गावांना जोडणारा वेण्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
किडगाव/सातारा : कण्हेर धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून, पाणीसाठा नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातूनवेण्णा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
परिणामी किडगाव व हमजाबाद या गावांना जोडणारा वेण्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दोन्ही गावांचा संपर्क तुटल्याने याचा विद्यार्थी व नोकरदारांना मोठा फटका बसला आहे.
सातारा तालुक्यासह कण्हेर धरण क्षेत्रात यंदा समाधानकार पाऊस झाला आहे. तालुक्यातील उरमोडी, कण्हेर ही धरणेही जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
कण्हेर धरणातील पाणीसाठा नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी किडगाव व हमजाबाद या गावांना जोडणाऱ्या वेण्णा पुलावरू पाणी वाहू लागले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
सातारा शहराकडे जाणारा जवळचा मार्ग म्हणून या पुलाकडे पाहिले जाते. त्यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्या नोकरदार व विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
वाहतूक बंद असल्याने याचा सर्वांनाच मोठा फटका बसत आहे. पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्यास मुलांना शाळेला सुटी घ्यावी लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून किडगाव परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.