सातारा : तमाशातला राजा; सकाळी डोक्यावर पेटी, साताऱ्यात राहुट्या लागल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 04:06 PM2018-03-12T16:06:43+5:302018-03-12T16:06:43+5:30
तमाशा कलेचा गेल्या ५० वर्षांपासूनचा वारसा आहे. कुठे आधार नसल्यामुळेच या तमाशाचा जिवावर दिवस काढावे लागत आहेत. गावोगावच्या देवांच्या जत्रा हेच आमचं जगण्याचं साधन असून तमाशातील राजा अन् सकाळी डोक्यावर पेटी, अशी आमची स्थिती आहे, हे वास्तव मांडले ते गोविंदराव पाटणकर या तमाशा मालकाने.
सातारा : तमाशा कलेचा गेल्या ५० वर्षांपासूनचा वारसा आहे. कुठे आधार नसल्यामुळेच या तमाशाचा जिवावर दिवस काढावे लागत आहेत. गावोगावच्या देवांच्या जत्रा हेच आमचं जगण्याचं साधन असून तमाशातील राजा अन् सकाळी डोक्यावर पेटी, अशी आमची स्थिती आहे, हे वास्तव मांडले ते गोविंदराव पाटणकर या तमाशा मालकाने.
सध्या गावोगावी ग्रामदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. त्यानिमित्ताने साताऱ्यातील श्री खंडोबाळाच्या माळावर तमाशा कलावंतांच्या राहुट्या लागू लागल्या आहेत. येथेच गोविंदराव पाटणकर यांनी मनमोकळ्या गप्पा मारताना गेल्या ५० वर्षांपासूनचा इतिहास समोर मांडला. तसेच शासनाकडून होणारे दुर्लक्षही कथन केले.
पाटणकर म्हणाले, वडील तमाशात कलाकार होते. त्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षापासून काम करण्यास सुरूवात झाली. ३० वर्षांपासून स्वत:चा तमाशाचा फड आहे तर आतापर्यंत ५० वर्षे या कलेसाठी गेली आहेत. पण, खरं सांगायचं झालं तर आम्ही कधीच मोठं झालो नाही. या तमाशाच्या फडावर काहीच भागत नाही.
चार महिन्यांचा हा खेळ असतो. त्यात ३० ते ४० सुपाऱ्या मिळतात. पण, त्यामागील खर्च पाहता हे सर्व झेपत नाही. दररोज ३० ते ३५ माणसांचा कबिला सांभाळायचा असतो. कलाकाराने घर सोडलं की सर्व आम्हालाच बघायला लागतं. त्यात एका सुपारीला ३० ते ३५ हजार रुपये मिळायचे. मग, सर्वांना पैसे देऊन जवळ काहीच राहत नाही. पण, हा व्यवसाय करण्याशिवाय समोर दुसरा पर्यायही नाही.
आम्हाला घर नाही की शेती नाही. हे चार महिने तमाशा झाला की जिवनाचाही तमाशा होतो. कारण, कुठेही मजुरी, रोजंदार, हमाली अशी कामे करतो. शासनही काही देण्यास तयार नाही. ६५ वर्षांवरील कलाकारांना मानधन मिळते. पण, हे मला तर अद्याप मिळालेले नाही. भारुडाच्या पोटी जन्माला आलेली ही कलाच कशीबशी जगविते. तर दुसरीकडे तमाशातून नाटक पुढे आले.
नाटकातून चित्रपट आले आणि ते सर्वजण अब्जाधीश झाले. पण, आम्हा तमाशा कलाकाराच्या जिवनाचा तमाशाच झाला. पोरं शिकतात, पण, नोकरी तरी त्यांना कुठे मिळते. मग काय तर तमाशातील फळ्या, पेट्या, कपडे उचलता-उचलता ते पण तमाशातीलच कलाकार होतात, अशी आमच्या जीवनाची तऱ्हा आहे.
साताऱ्यात आठ दिवस झालेतरी आणखी एकही सुपारी मिळाली नाही. स्पर्धेच्या या जगाचा आम्हाला फटका बसत आहे. त्यामुळे विचार करुन-करुन आता आजारही होऊ लागले आहेत, पण, जगायचं याच ध्येयाने तमाशा जिवंत ठेवला आहे, अशी सलही पाटणकर यांनी यानिमित्ताने बोलून दाखविली.