सातारा : मागासवर्गीयांच्या पुनर्वसनाची जमीन रेल्वेने बळकावली : पार्थ पोळके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 04:32 PM2018-05-24T16:32:32+5:302018-05-24T16:32:32+5:30
कोरेगाव तालुक्यातील भीमनगर येथे कोयना धरणातून विस्थापित झालेल्या मागासवर्गीय लोकांची तब्बल १२ एकर जमीन कोणताही मोबदला न देता रेल्वे खात्याने बळकावली आहे. या प्रकारामुळे बाधित लोक भूमिहीन झाले असून, त्याविरोधात ३१ मे रोजी सकाळी दहा वाजता जरंडेश्वरच्या हद्दीत रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याची माहिती मागासवर्गीय शेतकरी, धरणग्रस्त पंचायतचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा : कोरेगाव तालुक्यातील भीमनगर येथे कोयना धरणातून विस्थापित झालेल्या मागासवर्गीय लोकांची तब्बल १२ एकर जमीन कोणताही मोबदला न देता रेल्वे खात्याने बळकावली आहे. या प्रकारामुळे बाधित लोक भूमिहीन झाले असून, त्याविरोधात ३१ मे रोजी सकाळी दहा वाजता जरंडेश्वरच्या हद्दीत रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याची माहिती मागासवर्गीय शेतकरी, धरणग्रस्त पंचायतचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पार्थ पोळके म्हणाले, कोयना धरणातून सुमारे ६२ वर्षांपूर्वी विस्थापित झालेल्या मागासवर्गीय कुटुंबांचे पुनर्वसन भीमनगर (ता. कोरेगाव) येथे झाले होते. वास्तविक पुनर्वसन खात्याने पुनर्वसनासाठी जी जमीन संपादित केली होती, त्या ठिकाणी मागासवर्गीयांची ४५० लोकसंख्येचे गाव आहे. असे असताना रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना न देता या विस्थापित मागासवर्गीयांची जवळजवळ १२ एकर जमीन अनधिकृतपणे बळकावली आहे.
महाराष्ट्रातील कोणत्याच धरणातील विस्थापित मागासवर्गीय सुखी नाही. कोयना धरण होऊन ६२ वर्षे झाली, या धरणातील मागासवर्गीयांचे हाल अतिशय वाईट आहेत. जावळी तालुक्यातील आंबेडकर नगरातील विस्थापित मागासवर्गीयांनी स्वत: जमिनी खरेदी करून घरे
बांधली आहेत. शासनाने या लोकांना कायद्याने असलेली मदत केलेली नाही.
या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना संघटनेने निवेदन दिले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, राज्य उपाध्यक्ष भिकू सपकाळ, अनंता कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, नामदेव जगताप, शांताराम कांबळे, गौरव कांबळे आदी उपस्थित होते.
मागासवर्गीयांना भूमिहीन करण्याचा डाव
पुनर्वसन करताना ४५ एकराची जमीन देण्यात आली होती. त्यावर लोक विस्थापित झाले. त्यापैकी १२ एकर जमीन कोणतीही माहिती न देता परस्पर काढून घेऊन मागासवर्गीयांना भूमिहीन करण्यासाठी हा मोठा डाव आखला गेला आहे, याविरोधात जोरदार संघर्ष करणार असल्याचे पार्थ पोळके यांनी सांगितले.
या आहेत मागण्या
- -रेल्वेने घेतलेल्या जमिनीच्या मोबदल्यात पर्यायी जमीन मिळावी
- - रेल्वे लाईन बाधित शेतकऱ्यांच्या मुलांना रेल्वेच्या सेवेत घ्यावे