साताऱ्याचं सूत निघालं थेट चीनला...
By admin | Published: September 17, 2015 12:39 AM2015-09-17T00:39:10+5:302015-09-17T00:44:57+5:30
शिवेंद्रसिंहराजे भोसले : अजिंंक्यतारा सूतगिरणीचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नावलौकिक
सातारा : ‘दिवंगत भाऊसाहेब महाराजांनी उभारणी केलेल्या अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीचे सूत चीनला (शांघाय) निर्यात करण्यात आले आहे. ९७ हजार ५२४ किलो सूत निर्यातीतून सूतगिरणीला १ कोटी ५१ लाख रुपये मिळणार असून, तेवढे परकीय चलन आपल्या देशाला मिळणार आहे. सूतगिरणी चालू झाल्यानंतर अल्पावधीतच सूताची निर्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होऊ लागली आहे. यामुळे अजिंक्यस्पिनची कीर्ती जागतिक स्तरावर पोहोचली असून, अजिंक्यतारा सूत गिरणीचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढला आहे,’ असे गौरवोदगार अजिंक्य उद्योग समूहाचे मार्गदर्शक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
वळसे येथे सूतगिरणीच्या कार्यस्थळावर अजिंक्यस्पिन सूत शांघाय (चीन) येथे निर्यातीसाठीच्या पहिल्या दोन कंटेनर्सच्या पूजनप्रसंगी आ. ते बोलत होते. यावेळी सूतगिरणीचे अध्यक्ष रामचंद्र जगताप, उपाध्यक्ष हणमंतराव देवरे, कार्यकारी संचालक शंकर स्वामी, सिद्धिविनायक कॉटस्पिनचे अनिल विभुते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
‘अजिंक्यतारा’चे सूत सिद्धिविनायक कॉटस्पिन मुंबई यांच्यामार्फत चीनला निर्यात करण्यासाठी करार झाला आहे. ९७ हजार ५२४ किलो सूत निर्यात करण्यात येत आहे. पहिले दोन कंटेनर्स सूत मान्यवरांच्या उपस्थितीत चीनला रवाना झाले. उर्वरित तीन कंटेनर्स सूत सप्टेंबरअखेर निर्यात करण्यात येणार आहे. या सूत विक्रीतून १ कोटी ५१ लाख रुपये गिरणीला मिळणार असून, तेवढेच परकीय चलन आपल्या देशाला मिळणार आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सूत निर्यात शुभारंभप्रसंगी केले.
कार्यकारी संचालक स्वामी यांनी आभार मानले. सूतगिरणीचे संचालक पंडितराव सावंत, गणपतराव मोहिते, लक्ष्मण कदम, उत्तमराव नावडकर, जगन्नाथ किर्दत, सुरेशराव टिळेकर, रघुनाथ जाधव, बळीराम देशमुख, भगवान शेडगे, साधना फडतरे, जयवंतराव फडतरे, गिरणीचे प्रॉडक्शन मॅनेजर उदय औंधकर, मिल इंजिनिअर प्रदीप राणे, एसक्यूसी मॅनेजर रवी खेमलापुरे, सिनियर अकौंटंट मानसिंग पवार, कार्यालयीन अधीक्षक प्रवीण पवार, एचआर मॅनेजर राजेश दीक्षित आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)