सातारा : बिबट्या एकीकडे; पिंजरा दुसरीकडे!, दशहत कायम : मोरणा विभागात वाढला वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 11:08 AM2018-01-05T11:08:34+5:302018-01-05T11:13:58+5:30
मोरणा विभागातील कुसरुंड, नाटोशी, वाडीकोतावडे या गावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र, बिबट्या एकीकडे आणि पिंजरा दुसरीकडे अशी परिस्थिती आहे.
पाटण : मोरणा विभागातील कुसरुंड, नाटोशी, वाडीकोतावडे या गावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र, बिबट्या एकीकडे आणि पिंजरा दुसरीकडे अशी परिस्थिती आहे.
मोरणा विभागात गेले काही दिवस बिबट्याने धुमाकूळ घातला होता. वाडीकोतावडे, आंब्रग या विभागात रोज पंधरा दिवस शेळी, गाय, म्हैस आदी प्राण्यांवर हल्ले होत होते.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागच्या वतीने सापळाही लावण्यात आला होता. मात्र, पिंजरा लावल्यानंतर बिबट्याने हा परिसरत सोडून बाजूला असणाऱ्या नोटोशी, कुसरुंड, आडदेव या परिसरात मोर्चा वळविला आहे.
परिसरात सकाळ, सायकांळी आणि रात्री बिबट्याचे दर्शन होत आहे. दोन दिवसांपूर्वी कुसरुंड-नाटोशी रस्त्यावर डॉ. प्रकाश वरेकर हे कुसरुंड येथील क्लिनिक बंद करून येत असताना वरेकरवाडी येथील प्राथमिक शाळेसमोर रस्त्यावर बिबट्या उभा होता.
गाडीची लाईट पडल्याने तो बाजूला झाला. डॉ. वरेकर गाडी वेगात घेऊन जात असताना काही अंतरापर्यंत त्याने गाडीचा पाठलाग केला. या प्रकारामुळे सध्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाटोशी येथे ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यामुळे रात्री १२ वाजता काही ग्रामस्थ वरेकरवाडी येथील चौकात बसले असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. यावेळी ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या नजीकच्या उसाच्या शेतामध्ये पळाला. यामुळे कुसरुंड, नाटोशी, वाडीकोतावडे, आंब्रग या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मजुरांचा तुटवडा त्यात बिबट्याची भीती
मोरणा विभागात भात, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी काढणीची कामे सुरू आहेत. या कामाकरिता आधीच मजुरांची संख्या कमी असताना कुसरुंड, नाटोशी, आंब्रग, वाडीकोतावडे या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे मजूरही शेतात जाण्यास घाबरत आहेत. पिके चांगली येऊनही काढणीअभावी नुकसान होण्याची शक्यता आहे.