सातारा : विहिरीत पडलेल्या बिबट्याने स्वत:च घेतली बाहेर उडी, वन कर्मचारी घटनास्थळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 02:37 PM2018-12-28T14:37:27+5:302018-12-28T14:40:30+5:30
कऱ्हाड तालुक्यातील कालवडे येथील एका विहिरीत शुक्रवारी सकाळी एक बिबट्या पडला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. विहिरीभोवती ग्रामस्थांचा गराडा पडल्याने बिबट्या आणखीच भेदरला.
कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील कालवडे येथील एका विहिरीत शुक्रवारी सकाळी एक बिबट्या पडला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. विहिरीभोवती ग्रामस्थांचा गराडा पडल्याने बिबट्या आणखीच भेदरला.
विहिरीत बऱ्यापैकी पाणी असून, तो काठावर बसला होता. विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी, अधिकारी तेथे पोहोचले. त्यांनी बिबट्या बाहेर काढण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली.
त्याच दरम्यान भेदरलेल्या बिबट्याने स्वत:च विहिरीतून बाहेर उडी घेत गर्द झाडीमध्ये धूम ठोकली. बिबट्या अचानक बाहेर पडल्याने ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली. भयभीत झालेले ग्रामस्थ सैरावैरा सुरक्षितस्थळी पळाले.