सातारा : सहा महिने उलटले तरी मृत साहिलला न्याय नाही, बेकायदा वाळू उपसा, बोरखळमधील कृष्णा नदीत बुडून झाला होता मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 04:35 PM2018-01-08T16:35:17+5:302018-01-08T16:46:28+5:30
बोरखळ, ता. सातारा येथे कृष्णा नदीच्या पात्रात वाळू उपसा करण्यासाठी खोदलेल्या डबऱ्यात बुडून गावातीलच साहिल मोहन दीक्षित या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. आपल्या मुलाला न्याय मिळावा, किमान कुटुंबाला नुकसान भरपाई तरी मिळावी, यासाठी साहिलचे वडील मोहन आणि आई सरिता महसूल विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.
सातारा : बोरखळ, ता. सातारा येथे कृष्णा नदीच्या पात्रात वाळू उपसा करण्यासाठी खोदलेल्या डबऱ्यात बुडून गावातीलच साहिल मोहन दीक्षित या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता.
आपल्या मुलाला न्याय मिळावा, किमान कुटुंबाला नुकसान भरपाई तरी मिळावी, यासाठी साहिलचे वडील मोहन आणि आई सरिता महसूल विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.
मागील वर्षी ७ जून रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पाणवठ्यावर गेलेल्या साहिलचा वाळूसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेची पोलिस दफ्तरी अकस्मात मयत अशी नोंद झाली. या प्रकरणात त्रयस्थ व्यक्तीची फिर्याद घेतली गेली.
पालकांना या कायदेशीर प्रक्रियेपासून दूर ठेवून वाळू उपसा करणाऱ्यांना व त्यास सहकार्य करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना पोलिस तपास अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप पिपल्स रिपब्लिकन पार्टीने केला आहे.
साहिलच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी पक्षाच्या वतीने त्याच्या पालकांसह सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले.
बेकायदा काढलेल्या खड्ड्यात साठलेल्या पाण्यात बुडून साहिलचा मृत्यू झाला असल्याने संबंधित वाळू व्यावसायिक, प्रशासकीय यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या सर्व घटकांमुळे साहिलचा मृत्यू झाला, अशी फिर्याद नोंदवावी.
तसेच साहिल याच्या पालकांना २५ लाख रुपये इतकी नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात यावी, वाळू तस्करी व घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.