भावी खासदारांसाठी ‘गृह’मंत्र्यांनी सांभाळली प्रचाराची धुरा!, साताऱ्यात उमेदवारांच्या पत्नींकडून गाठीभेटी, सभा
By सचिन काकडे | Published: April 22, 2024 01:34 PM2024-04-22T13:34:44+5:302024-04-22T13:35:19+5:30
सचिन काकडे सातारा : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका सुरू करण्यात आला आहे. नेत्यांसाठी कार्यकर्ते ...
सचिन काकडे
सातारा : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका सुरू करण्यात आला आहे. नेत्यांसाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असले तरी लोकसभेच्या प्रमुख दोन उमेदवारांच्या ‘गृह’मंत्र्यांनी देखील पतीच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. अगदी उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते लोकांच्या गाठीभेटी व सभांच्या मैदानातही उमेदवारांच्या पत्नींचा सहभाग दिसून येत आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघ अन् इथले राजकारण अवघ्या राज्यात चर्चेचा विषय ठरते. यंदा देखील प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्षांनी निवडणुकीसाठी दंड थोपटले असले तरी निवडणुकीचा सामना ‘महायुती’ विरुद्ध ‘महाविकास’ आघाडी असाच रंगणार आहे. साताऱ्यासाठी दि. ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून प्रचाराने गती घेतली आहे.
सध्या राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार कार्य जोरदार सुरू आहे. खासदारकीच्या या लढाईत आता प्रमुख दोन उमेदवारांच्या पत्नींनी देखील सहभाग घेतला आहे. त्यांनी घरोघरी संपर्क अभियान सुरू केले असून, मतदारांच्या गाठीभेटी, कोपरा सभा, बैठकांना स्वत: उपस्थित राहून प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.
कुटुंबाचाही सहभाग..
साताऱ्यातील दोन प्रमुख उमेदवारांनी भव्य-दिव्य रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या रॅलीत कार्यकर्तेच नव्हे तर घरातील सदस्य देखील उपस्थित होते. आता प्रचार कार्यातही उमेदवारांच्या घरातील अन्य सदस्य सहभागी झाले असून, कार्यकर्त्यांच्या सोबतीने दररोजच्या गाठीभेटी, सभा, बैठकांचे नियोजन करणे, कार्यक्रमांना उपस्थिती लावणे, कार्यकर्त्यांना काय हवं, काय नको? याची खबरदारी घेणे, अशी कामे घरातील सदस्यांकडून पार पाडली जात आहेत.
.. तरीही स्वीकारली जबाबदारी
साताऱ्यातील दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या सहचारिणींनी आजवर कधीही राजकारणात सक्रिय सहभाग घेतला नाही. त्या कोणत्या पक्षाच्या सदस्य अथवा कार्यकर्त्या देखील नाहीत. तरी देखील त्यांनी पतीसाठी केवळ प्रचाराची जबाबदारी स्वीकारली नाही तर पतीच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या आहेत.
वैशाली शिंदे यांचा थेट संवादावर भर..
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या पत्नी वैशाली शिंदे यांनी आतापर्यंत कोरेगाव, सातारा, महाबळेश्वर तालुक्यात गावांगावंमध्ये जावून महिलांशी संवाद साधत आहेत. मेळावे, पदयात्रा, हळदीकुंकु कार्यक्रम घेत आहेत. महाविद्यालयीन तरुणी, शेतकरी, व्यापारी , दुकानदार , व्यवसायिकांसह ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेत आहेत.
दमयंतीराजे यांचा मेळाव्यांवर भर..
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले यांनीदेखील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दौरा, बैठकांचा धडाका सुरू केला आहे. मतदारसंघात त्यांनी आतापर्यंत वीस मेळावे घेतले आहेत. महिला व तरुणींशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणीदेखील त्या जाणून घेत आहेत.