साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात कोण? श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार; शरद पवार मोठा पत्ता काढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 01:58 PM2024-03-29T13:58:01+5:302024-03-29T14:00:54+5:30
Satara Lok Sabha Election 2024 : "माझी तब्येत ठीक नसल्यानं मी निवडणूक लढवू इच्छित नाही, असं श्रीनिवास पाटील यांनी खासदार शरद पवार यांना कळवलं आहे.
Satara Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीकडून आता खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आता खासदार शरद पवार या मतदारसंघात कुणाला उमेदवारी देणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. आज खासदार शरद पवार यांनी साताऱ्यात कार्यकर्त्यांची बैठक घेतली, या बैठकीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आरोग्याचं कारण देत पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. यामुळे आता शरद पवार (Sharad Pawar) कुणाला उमेदवारी देणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.
"माझी तब्येत ठीक नसल्यानं मी निवडणूक लढवू इच्छित नाही, असं श्रीनिवास पाटील यांनी खासदार शरद पवार यांना कळवलं आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारीसाठी आज शरद पवार यांनी साताऱ्यात विधानसभानिहाय बैठका घेतल्या आहेत.
बिहारमध्ये लालूंनी काँग्रेसला अखेर खिंडीत गाठले; पाच पक्षांचे जागावाटप जाहीर, कोणाला किती?
यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. लोकसभेत श्रीनिवास पाटील यांनी चांगले काम केले. पुन्हा त्यांनी एकदा निवडणुकीत उभं रहावं अशी आमची मागणी होती. पण, त्यांनी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. मी जरी उमेदवारी घेतली नाही तरी मी पक्ष देईल ती जबाबदारी पूर्ण करेन असं श्रीनिवास पाटील यांनी सांगितल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. सातारा जिल्हा आम्हाला पाठिंबा देणारा जिल्हा आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विश्वासात घेतलं पाहिजे. साताऱ्यात उमेदवार देताना विशेष काळजी घ्यावी लागेल, असंही शरद पवार म्हणाले.
"आज सहकाऱ्यांनी अनेकांची नाव सुचवली आहेत, काहींनी माझंही नाव सुचवलं. आज तुम्ही केलेल्या सुचनेवर आम्ही विचार करु, असंही पवार म्हणाले.
'या' नेत्यांची नाव चर्चेत
खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यामुळे आता नव्या उमेदवाराची घोषणा पवार करणार आहेत. दोन दिवसात नव्या उमेदवाराची घोषणा करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 'राष्ट्रवादी'( शरदचंद्र पवार) पक्षातून आमदार बाळासाहेब पाटील, सुनील माने, आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील आणि सत्यजित पाटणकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.