उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 04:28 PM2024-04-29T16:28:50+5:302024-04-29T16:40:46+5:30
Satara Lok Sabha Election 2024: साताऱ्यात उदयनराजे भोसले विरूद्ध शशिकांत शिंदे अशी थेट लढत होणार आहे.
Udayanraje Bhosale | सातारा : सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा कमळ चिन्हावर आपले नशीब आजमावत आहेत. यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचे आव्हान आहे. कधीकाळी एकमेकांसाठी मत मागणारे शरद पवारांचे हे दोन्ही शिलेदार आता लोकसभेला एकमेकांविरोधात लढत आहेत. पण, लोकसभेला प्रथमच 'घड्याळा'ची कमी असल्याने याचा फटका आणि फायदा कोणाला होतो हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. यावेळी सातऱ्यात तुतारी विरूद्ध कमळ अशी थेट लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी 'लोकमत' व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
उदयनराजे भोसले म्हणाले की, उमेदवारीबाबत माझ्या मनात शंका नव्हती. वेळ लागला असला तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह इतर मित्रपक्षांसोबतच्या चर्चेत वेळ जातच असतो. आम्ही नुकताच संकल्पनामा जाहीर केला आहे. १० हजार कोटी रूपयांची कामे माझ्या माध्यमातून झाली आहेत. तसेच खासदार झाल्यावर काय रोडमॅप असेल यावर त्यांनी सांगितले की, नमो गंगाचे जसे शुद्धीकरण झाले त्याच पद्धतीने नमो कृष्णाचे शुद्धीकरण झाले पाहिजे. पाणी दूषित होऊन काही होऊ नये आणि लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रयत्न करणार आहे.
उदयनराजेंची टोलेबाजी
तसेच शरद पवार कॉलर उडवत आहेत, ते असे करत आहेत कारण की, ते माझी स्टाईल करून मी चांगले काम करत असल्याचे सांगत आहेत. ते कॉलर उडवून याचे संकेत देत आहेत. त्यांना देखील माहिती आहे की, आपल्या पक्षाने चुकीचा उमेदवार दिलाय. मी मित्र मंडळीसोबत बसलो असताना कॉलर उडवण्याचा किस्सा घडला. रविवारचा दिवस होता बॉलिवूड आणि हॉलिवूडबद्दल गप्पा रंगल्या होत्या. मग राजकारणाचा विषय निघाला तेव्हा पॉलिटिक्सचा 'पॉलिवूड' अशी चर्चा झाली. तेव्हा मी बोललो की पॉलिटिक्स म्हणजे पॉलिवूड... फरक फक्त एवढाच की तिकडे रिटेक घेता येतो इथे नाही. एकतर इन नाही तर आऊट असे इथे असते. राज्याचे पॉलिवूड झालंय असे मी म्हणत नाही. पण, काही लोकप्रतिनिधी लोकांकडे दुर्लक्ष करतात, घोटाळे करतात. कुणी काय कमावले हे मला माहिती नाही पण मी लोकांचा विश्वास कमावला असून, यात मी समाधानी आहे, असेही उदयनराजेंनी नमूद केले.