Satara Lok Sabha Result 2024: साताऱ्यात शशिकांत शिंदे आघाडीवर
By दीपक शिंदे | Published: June 4, 2024 09:41 AM2024-06-04T09:41:42+5:302024-06-04T09:47:28+5:30
Satara Lok Sabha Result 2024: साताऱ्यात शशिकांत शिंदे आघाडीवर
सातारा : Satara Lok Sabha Result 2024 राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीस आज, मंगळवारी एमआयडीसी, कोडोली येथील जिल्हा मार्केट फेडरेशन येथे सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी आघाडी घेतली आहे. शिंदे यांनी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांना पिछाडीवर टाकत पहिल्या फेरीत २०० मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपला याठिकाणी सुरुवातीच्या कलानुसार धक्का बसला आहे. २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
उदयनराजे भोसले यांना आतापर्यंत २५०३ मते मिळाली तर शशिकांत शिंदे यांना २७४२ मते मिळाली असून २३९ मतांनी शिंदे यांना आघाडी घेतली आहे.
सातारा लोकसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात होते. खरी लढत ही भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यातच झाली. या दोघांनी मतदारसंघात प्रचाराचे रान उठवले होते. तसेच या दोघांसाठी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्यांनी सभा झाल्याने मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती.
६३ टक्क्यांवर मतदान
सातारा लोकसभा मतदारसंघात यंदा सुमारे तीन टक्क्यांनी मतदान वाढले. त्यामुळे ६३ टक्क्यांवर मतदान झाल्याने हा वाढता टक्का कोणाला धक्का अन् कोणाला फायदा होणार हे आज स्पष्ट होणार आहे. १८ लाख ८९ हजार ७४० पैकी ११ लाख ९३ हजार ४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज मार्केट फेडरेशनच्या गोदामात १५४ टेबलवर ही मतमोजणी होत आहे. यासाठी अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे ८०० जणांची टीम सज्ज आहे.