Satara lok sabha result 2024: साताऱ्यात उदयनराजे भोसले पिछाडीवर, शशिकांत शिंदे १९ हजार मतांनी आघाडीवर
By सचिन काकडे | Published: June 4, 2024 01:01 PM2024-06-04T13:01:43+5:302024-06-04T13:02:14+5:30
Satara lok sabha result 2024: शशिकांत शिंदे यांनी आपली आघाडी कायम ठेवली
सातारा : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदार संघाचा निकाल फेरीनिहाय समोर येत असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. नवव्या फेरीअखेर शशिकांत शिंदे यांना २ लाख ६३ हजार ८३४२ तर महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना २ लाख ४४ हजार २७१ मते मिळाली. शशिकांत शिंदे १९ हजार ७१ मतांनी आघाडीवर आहेत.
साताऱ्यात कोडोली येथील जिल्हा मार्केट फेडरेशनच्या गोदामात मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रारंभी पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. यानंतर फेरीनिहाय मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या फेरीनंतर शशिकांत शिंदे यांनी आघाडी घेत उदयनराजे यांना पिछाडीवर टाकले.
उदयनराजे भोसले यांना पहिल्या फेरीत २७ हजार ५५६ तर शशिकांत शिंदे यांना २७ हजार ५०७ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत उदयनराजे यांना ५३ हजार ३०४ तर शशिकांत शिंदे यांना ५७ हजार ७४६ मते मिळाली. तिसऱ्या फेरीत उदयनराजे यांना ७४ हजार ३१० तर शशिकांत शिंदे यांना ८२ हजार ९४६, चौथ्या फेरीत उदयनराजे यांना ९९ हजार २७३ तर शशिकांत शिंदे यांना १ लाख १२ हजार ४७५ मते मिळाली. पाचव्या फेरीअखेर उदयनराजे यांना १ लाख २८ हजार ३७५ तर शशिकांत शिंदे यांना १ लाख ४१ हजार ८२ मते मिळाली. दुसऱ्या फेरीनंतर शशिकांत शिंदे यांनी घेतलेली आघाडी नवव्या फेरीपर्यंत कायम राहिली. नऊ फेऱ्यांचा निकाल हाती आला तेव्हा शशिकांत शिंदे यांनी १९ हजार ७१ मतांनी आघाडी घेतली.
मोठी आघाडी नाही..
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार उभे होते. मात्र प्रमुख लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होत आहे. प्रमुख दोन उमेदवार वगळता अन्य एकाही उमेदवाराला मतांमध्ये मोठी आघाडी अद्याप घेता आलेली नाही.