पृथ्वीराज चव्हाणांसाठी धोक्याची घंटा; 'कराड दक्षिण'ची सेमी फायनल अतुल भोसलेंनी जिंकली
By प्रमोद सुकरे | Published: June 5, 2024 10:29 PM2024-06-05T22:29:37+5:302024-06-05T22:30:35+5:30
काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटलांवर आत्मचिंतनाची वेळ
कराड - नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक म्हणजे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाहिली जात होती. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येकानेच प्रतिष्ठा पणाला लावत काम केले होते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघही त्याला अपवाद नाही. पण काँग्रेस विचारांचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघात प्रथमच भाजपने मताधिक्य घेतल्याने डॉ.अतुल भोसले यांनी विधानसभेची सेमी फायनल जिंकली अशीच चर्चा सुरू झाली आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा यशवंत विचारांचा किंवा काँग्रेस विचारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आजवर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपची लाट आली तरी या मतदारसंघाने काँग्रेसचाच आमदार निवडून दिला आहे. आजवर येथून दिवंगत यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील -उंडाळकर यांनी नेतृत्व केले. तर सध्या काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नेतृत्व करीत आहेत.
भाजपचे नेते डॉ.अतुल भोसले यांनी यापूर्वी २ वेळा कराड दक्षिणमधून नशीब आजमावले. पण त्यावेळी त्यांना यश आले नाही. मात्र त्यांनी आपली चिकाटी सोडलेली नाही .कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी सातत्याने विकास कामे व समाजकार्याचा धडाका सुरू ठेवला आहे.
नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक त्यांनी विधानसभेची सेमी फायनल म्हणूनच लढली. त्यासाठी अथक परिश्रम घेतले. आणि त्याचेच फलित म्हणून यावेळी ६१६ मतांचे मताधिक्य भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना दिले गेले आहे. या मतांनी उदयनराजे भोसले यांच्या विजयाला हातभार लावला आहेच पण उद्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मार्गावर त्यांनी यशाची बिजे रोवली आहेत असंच म्हटलं तरी वागत ठरणार नाही.
मताधिक्य चर्चेचा विषय
गत लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदार संघातून राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार खासदार श्रीनिवास पाटील यांना सुमारे ३१ हजारांचे मताधिक्य दिले होते. यावेळी कराडचा उमेदवार नसल्याने हे मताधिक्य कमी होईल असा अनेकांचा कयास होता. पण कराड दक्षिणेत भाजप मताधिक्य घेईल असं कोणीही म्हटण्याचं धाडस करत नव्हते. पण डॉ.अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ६१६ मतांची घेतलेले मताधिक्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
त्यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ
कराड दक्षिण हा काँग्रेस विचारांचा मतदारसंघ मानला जातो. येथे काँग्रेस अंतर्गत असणारे दोन परस्परविरोधी गट सर्वश्रुत होते. मात्र अलीकडच्या काही वर्षात हे दोन गट एकत्रित आले आहेत. स्थानिक शिखर संस्थांच्या निवडणुकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण व अँड. उदयसिंह पाटील यांनी एकीचे बळही दाखवून दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस दक्षिणेत मताधिक्य घेणारच फक्त किती? एवढीच चर्चा होत होती. पण प्रत्यक्षात काँग्रेसची झालेली पिछाडी नेत्यांसह कार्यकर्त्यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी कराड दक्षिण मतदार संघात ३ लाख ३ हजार ८८० एवढे मतदार होते. पैकी १ लाख ९७ हजार ६९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे सुमारे ६५.२७ टक्के मतदान झाले होते. प्रत्यक्षात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना ९२ हजार ८१४ तर राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना ९२ हजार १९८ एवढी मते मिळाली. तर इतर उमेदवारांना मिळून १३ हजार ६१४ मते मिळाली. यात उदयनराजे भोसले यांना ६१६ मतांचे मताधिक्य मिळाल्याचे स्पष्ट होते.
यापूर्वी नगरपालिकेत फुलले होते कमळ !
खरंतर कराड च्या मातीत यापूर्वी एकदा कमळ फुलले होते. तेही नगरपालिकेच्या निवडणुकीत. सन २०१६ मध्ये झालेल्या थेट नगराध्यक्षा पदाच्या निवडणुकीत भाजपच्या रोहिणी शिंदे यांनी तिरंगी लढतीत बाजी मारत विजय संपादन केला होता. त्यानंतर आता कराड दक्षिणेत लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मताधिक्य मिळालेले आहे.