सातारा लोकसभेसाठी मतमोजणीच्या २३ फेऱ्या; सायंकाळी सहापर्यंत निकाल जाहीर होणार

By नितीन काळेल | Published: May 31, 2024 07:12 PM2024-05-31T19:12:23+5:302024-05-31T19:13:45+5:30

विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी २० टेबल

Satara Lok Sabha result will have to wait till evening, 23 rounds of vote counting will be held | सातारा लोकसभेसाठी मतमोजणीच्या २३ फेऱ्या; सायंकाळी सहापर्यंत निकाल जाहीर होणार

सातारा लोकसभेसाठी मतमोजणीच्या २३ फेऱ्या; सायंकाळी सहापर्यंत निकाल जाहीर होणार

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होत असून एकूण २३ फेऱ्या होणार आहेत. सायंकाळी सहा ते सातपर्यंत निकाल घोषित होईल यासाठीही प्रशासनाकडून तयारी केली जात आहे, तसेच या मातमोजणीदरम्यान ५८४ अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त असणार आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तरी खरी लढत ही भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारातच झाली आहे. निवडणुकीसाठी ६३.१६ टक्के मतदान झाले आहे. मतदानानंतर ईव्हीएम मशीन सातारा शहराजवळील औद्योगिक वसाहतीत सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी खडा पहारा आहे. पहिल्या क्रमांकावर सेंट्रल आर्म पोलिस फोर्स (सीएपीएफ), दुसऱ्या क्रमांकावर स्टेट आर्म पोलिस फोर्स (एसएपीएफ) आणि गोदामाच्या गेटवर स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त आहे, तसेच याच ठिकाणी सीसीटीव्हीही बसविण्यात आलेल्या आहेत.

सातारा लोकसभेसाठी मतदान झाल्यानंतर तब्बल २६ दिवसांनंतर मतमोजणी होणार आहे. दि. ४ जून रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मतमोजणीसाठी किती टेबल राहणार, किती अधिकारी आणि कर्मचारी असणार याचे पूर्ण नियोजन झालेले आहे, तर सातारा लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण मतमोजणी २३ फेऱ्यात पूर्ण होणार आहेत. यासाठी ५८४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी २० टेबल

सातारा लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण सहा मतदारसंघाचा समावेश आहे. सातारा, वाई, कोरेगाव, पाटण, कऱ्हाड उत्तर आणि कऱ्हाड दक्षिण हे मतदारसंघ येतात. या सर्व विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची प्रत्येकी २० टेबलवर मतमोजणी होणार आहे. तर सातारा आणि वाई विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाच्या प्रत्येकी २३ मतमोजणी फेऱ्या होतील. पाटण विधानसभा मतदारसंघात २१, कोरेगाव १८, कऱ्हाड उत्तर १७ आणि कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी १६ मतमोजणी फेऱ्या होणार आहेत.

९७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती; २४ राखीव..

सहा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ९७ अधिकारी आणि कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच प्रत्येकी २४ कर्मचारीही राखीव ठेवण्यात आलेले आहेत. अशाप्रकारेही जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी केलेली आहे.

  • मतदारसंघात एकूण मतदान - १८ लाख ८९ हजार ७४०
  • एकूण झाले मतदान - ११ लाख ९३ हजार ४९२
  • मतदानाची टक्केवारी - ६३.१६

Web Title: Satara Lok Sabha result will have to wait till evening, 23 rounds of vote counting will be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.