सातारा लोकसभेची जागा भाजपाच लढवणार; जयकुमार गोरे यांचा दावा
By दीपक देशमुख | Published: December 10, 2023 03:06 PM2023-12-10T15:06:03+5:302023-12-10T15:06:24+5:30
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सातारा लोकसभा आम्ही लढवू अशी भुमिका मांडली. ती त्यांची व्यक्तिगत भुमिका आहे. वास्तविक गेल्या चार वर्षापासून भाजपने मोठ्या ताकदीने सातारा जिल्ह्यात कामे केले असून जिल्ह्यात पक्ष अव्वल क्रमांकाचा आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपच लढवेल. कोणत्याही परिस्थितीत सातारा लोकसभेची जागा भाजपकडेच राहिल, असा दावा आ. जयकुमार गोरे यांनी केला. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आ. गोरे म्हणाले, सातारा-जावली, वाई-खंडाळा-महाबळेश्वर, कोरेगाव, कऱ्हाड उत्तर आणि दक्षिण आणि पाटण या सर्व मतदार संघाचा विचार करता जिल्ह्यात भाजपचेच प्राबल्य आहे. त्यामुळे कोण काय भुमिका मांडते, याबाबत वरिष्ठ चर्चा करतील अणि वरिष्ठच बोलतील. गेल्या चार वर्षांपासून लोकसभेची आम्ही तयारी केली आहे. सध्यस्थितीत भाजपच्या उमदेवारास कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे हा मतदारसंघ कोणत्याही किंमतीवर भाजपकडे राहिला पाहिजे, अशी आमची ठाम भुमिका आहे. ही भूमिका पक्षश्रेष्ठींकडेही मांडली आहे. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात, त्याची अंमलबजावणी आम्ही कार्यकर्ते घेत असतो. परंतु, आमचा आग्रह आहे की, कुठल्याही परिस्थितीत सातारा लोकसभेचा मतदार संघ भाजप सोडणार नाही.
स्थानिक पातळीवर महायुतीत एकमत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला असता आ. गोरे म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपली भुमिका मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, भुमिका मांडताना सर्वांनी विचारपूर्वक भुमिका मांडावी. जागावाटप हे तिन्ही पक्षांच्या समन्वयाने होईल. त्यापुर्वीच चर्चा सुरू होणे योग्य नाही. राष्ट्रवादी जिल्ह्यात प्रबळ होती, परंतु आता प्रबळ नाही. सध्या भाजप सोडल्यास इतर पक्षांना खूप कमी वाव आहे. त्यामुळे सातारा मतदार संघ भाजप ताकदीने लढेल, असेही आ. गोरे म्हणाले. राष्ट्रवादी बैठकीतील आरोपास प्रत्त्युत्तर देताना आ. गोरे म्हणाले, आ. शशिकांत शिंदे यांनी स्वत:चे बसावे. राष्ट्रवादीच्या बैठकीला व्यासपिठावर अर्धी लोकं तर काँग्रेसचीच दिसत होती. पदाधिकारी निवडीत सगळ्यांनाच न्याय देणे शक्य नसते. अनेक छोट्या-मोठ्र्या नाराजीचा विषय होतो. त्यांच्याशी चर्चा झाली आहे. संघटनेत सर्वांना सामावून घेवून काम केले जाईल असे आ. गोरे म्हणाले.
पक्षाचा उमेदवार वरिष्ठ पातळीवर ठरेल
भाजपचा उमेदवार कोण असेल यावर आ. गोरे म्हणाले, भाजप ही शिस्तप्रिय पक्ष आहे. पक्षाचा उमेदवार जिल्हापातळीवर नव्हे तर वरिष्ठ पातळीवर ठरतो. पक्ष जो उमदेवार देईल, तो सक्षमपणे लोकसभा लढवेल अन् साताराचा खासदार भाजपचा असेल. तिन्ही पक्षाची महायुती असली तर सातारा लोकसभेच्या जागेवर पहिला अग्रहक्क भाजपचा आहे. उमेदवारीबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते साताऱ्यात येवून गेले आहेत. त्यांच्याकडे अहवाल गेला आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येईल.