सातारा, माढा लोकसभा: खासदारकीसाठी इच्छुक उमेदवार नेमके गेले कुठे?
By नितीन काळेल | Published: April 23, 2024 07:19 PM2024-04-23T19:19:01+5:302024-04-23T19:19:38+5:30
कोणी पक्षाबरोबर तर कोणी पूर्ण सक्रिय नाहीत
सातारा : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेकांनी खिंड लढविण्याची तयारी केलेली. पण, पक्षाकडून उमेदवारी न मिळणे, मतदारसंघ दुसऱ्या पक्षाकडे जाणे यामुळे अनेकजण नाराज झाले. तरीही काहींनी पक्ष, आघाडी-युतीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. तर काहीजण अजूनही प्रचारात पूर्णपणे सक्रिय नसल्याचे दिसत आहे.
सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यातील सातारा, वाई, कोरेगाव, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचा समावेश सातारा लोकसभेसाठी होतो. तर सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभेसाठी साताऱ्यातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघ जोडले आहेत. सातारा तसेच माढा मतदारसंघातून राजकीय पक्षाकडून अनेकजण इच्छुक होते. पण, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. अशा इच्छुकांची संख्या अधिक आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत भाजप की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सुटणार हा तिढा तीन आठवडे चालला. भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले तयारीत होते. तर राष्ट्रवादीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांची दावेदारी होती. पण, मतदारसंघ भाजपला गेल्यानंतर नितीन पाटील यांना निवडणूक लढवता आली नाही. सध्या त्यांची भूमिका महायुती उमेदवार प्रचारात सक्रियपणे दिसून येत नाही.
तर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव हेही तयारीत होते. यापूर्वीही त्यांनी दोनवेळा निवडणूक लढविलेली. पण, पराभूत व्हावे लागले. यंदाही ते निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मतदारसंघ शिवसेनेकडे घेण्याबाबत त्यांनी चर्चा केली. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेटी घेतली. पण, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. सध्या त्यांनी महायुतीचे उमेदवार उदयनराजे यांच्यासाठी प्रचार सुरू केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हेही सातारा मतदारसंघातून इच्छुक होते. पण, पक्षाने माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला. तरीही माने यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवत प्रचारास सुरुवात केली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली. पण, पक्षाने भाजपचे धैर्यशील मोहिते-पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. त्यामुळे जगताप यांनी बंडाचा झेंडा फडकवला होता. तसेच निवडणूक अपक्ष लढविण्याची तयारी केलेली. पण, शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीनंतर त्यांनी बंडाचा झेंडा खाली घेतला. सध्या ते महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते यांच्याबरोबर आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छुक हाेतो. यासाठी अनेक राजकीय नेत्यांची भेट घेऊन भूमिका मांडली. या निवडणुकीत मला उमेदवारी मिळाली नसली तरी महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासोबत आहे. मी नाराज नाही. तसेच कार्यकर्त्यांबरोबर महायुतीचा प्रचार सुरू केला आहे. - पुरुषोत्तम जाधव, जिल्हाप्रमुख शिवसेना शिंदे गट
राष्ट्रवादीकडून माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी केलेली. पण, उमेदवारी मिळाली नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीनंतर निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. मी नाराज नाही. या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारात मी आणि कार्यकर्ते सहभागी आहोत. - अभयसिंह जगताप, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस