जातीपातीच्या पलीकडे सातारा महामोर्चा
By Admin | Published: October 2, 2016 12:38 AM2016-10-02T00:38:47+5:302016-10-02T00:38:47+5:30
वाई तालुक्यातील एकवीस समाज पाठीशी
कवठे : कवठे, ता. वाई येथे दि. ३० सप्टेंबर रोजी सातारा येथील मराठा महामोर्चाच्या प्रचारार्थ जनजागृती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चाच्या अग्रस्थानी ट्रॉलीमध्ये स्टेज व्यवस्था करण्यात आली होती. मोर्चा प्रत्येक चौकात थांबवून प्रत्येक चौकामध्ये मुलींची मोर्चासंदर्भातील उत्स्फूर्त भाषणे होत होती. अग्रस्थानी शालेय विद्यार्थी त्यानंतर महिला व सर्वात शेवटी पुरुषवर्ग मोर्चात मार्गक्रमण करीत होते. प्रामुख्याने मोर्चाचा उद्देश व सर्वांनी सातारा येथील महामोर्चामध्ये एक दिवस मोर्चासाठी द्यावा व त्यामध्ये सर्वांनी सामील होण्यासाठी प्रबोधन करण्यात येत होते.
मोर्चाच्या समारोपाच्या ठिकाणी मोर्चात सामील होण्यासाठीचे नियम व त्यासंदर्भातील आचारसंहितेचे सर्वांनी पालन करण्यासंदर्भात सूचना व शपथ देण्यात आली. शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महामोर्चामध्ये सामील होण्यासाठी व पाठिंबा दर्शवत कवठे परिसरातील २१ समाजबांधवांनी महामोर्चास पाठिंबा दिल्याचे पत्र या ठिकाणी देण्यात आले. (वार्ताहर)
दुर्गाभक्त होणार महामोर्चात अनवाणी सामील
महामोर्चात सहभागी व्हायची इच्छा असली तरी वयोमानाने महामोर्चात ज्यांना जायला जमणार नाही, असे सर्व ज्येष्ठ नागरिक गावाची व नवरात्रोत्सव मंडळांच्या मंडपांची संरक्षणाची जबाबदारी घेणार असून, प्रतिवर्षी नवरात्रोत्सवात चप्पल पाळणारे दुर्गाभक्त अनवाणी महामोर्चात सामील होणार आहेत.
कवठेत सर्व व्यवहार बंद
महामोर्चाला जाण्यासाठी कवठे परिसरातील सर्व व्यावसायिक तसेच शेतकरी वर्ग आपले सर्व व्यवहार बंद ठेवून महामोर्चात सहभागी होणार असल्याचे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले. विठ्ठलवाडी येथे सुद्धा कवठे येथील मोर्चा संपल्यानंतर जाऊन बैठकीचे आयोजन करून महामोर्चात विशेषत: महिला वर्गाने सामील होण्यासाठी आवाहन केले.