सातारा ‘महायुती’त अजूनही ‘गोंधळात गोंधळ’
By Admin | Published: August 29, 2014 09:35 PM2014-08-29T21:35:17+5:302014-08-29T23:12:10+5:30
जागावाटपाचे चित्र स्पष्ट नाही : प्रत्येक मतदारसंघात त्रांगडे
सातारा : जिल्ह्याचा विचार करता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जागावाटप आघाडीधर्मानुसार निश्चित झाले असतानाच महायुतीमध्ये सहभागी घटक पक्षांचा जागावाटपाचा घोळ काही केल्या मिटायला तयार नाही. परिणामी सातारा जिल्ह्यातील महायुतीचे कार्यकर्तेही गोंधळात पडले आहेत. एका बाजूला आयाराम-गयारामना पक्षात थारा नाही, अशी घोषणा करावयाची आणि दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते पक्षात येणार म्हणून जागावाटपही निश्चित नाही. त्यामुळे प्रचार नेमका कोणाचा करायचा, अशा संभ्रमावस्थेत महायुतीचे कार्यकर्ते आहेत.
सातारा जिल्ह्यात कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर, पाटण, कोरेगाव, वाई, सातारा, माण आणि फलटण असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपकडे कऱ्हाड दक्षिण, सातारा आणि माण असे तीन विधानसभा मतदारसंघ होते, मात्र लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर आल्यानंतर जिल्हा कार्यकारिणीने तीनबरोबरच कोरेगाव आणि वाई असे एकूण पाच मतदार संघ मागितले आहेत. उर्वरित फलटण, कऱ्हाड उत्तर आणि पाटण येथेही अजून संभ्रमावस्था आहे.
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, स्वाभिमानी, रिपाइं आणि शिवसंग्राम असे पाच पक्ष सहभागी आहेत. शिवसंग्रामचे आ. विनायकराव मेटे यांनी गेल्या पंधरवड्यात कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत ‘कऱ्हाड दक्षिण’ स्वाभिमानी पक्षाला सोडला तर ‘कऱ्हाड उत्तर’ आम्हाला हवा, असे सांगत स्वाभिमानीची गोची केली आहे. मात्र, दोन्हीही मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे. गेल्यावेळी कऱ्हाड उत्तर शिवसेनेकडे होता, त्यामुळे त्यांची भूमिका काय राहणार, याकडेही नजरा आहेत.
राष्ट्रीय समाज पक्षाने सातारा जिल्ह्यातील भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही. तरीही माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघावर त्यांचा दावा राहणारच आहे. मात्र, फलटणमधून स्वाभिमानी आणि शिवसेना आग्रही असल्यामुळे येथेही महायुतीची मोठी गोची होणार आहे.
माण विधानसभा गेल्यावेळी भाजपकडे होता. येथून दिलीप येळगावकर लढले होते. याचवेळी ‘रासप’कडून सुरेंद्र गुदगे उमेदवार होते. आता मात्र, माणमधील वाढत्या सत्तासंघर्षामुळे आणि उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे कधी काय होईल, हे सांगता येत नाही. तरीही प्रत्येक इच्छुक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महायुतीकडे जाऊन थडकून आला आहे. शेखर गोरे, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई यांनीही मिळेल त्या पक्षाकडून नाहीतर अपक्ष लढण्याची घोषणाच केली आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आमदार मदन भोसले यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चेमुळे भाजप वाईतून आग्रही आहे तर दुसरीकडे नुकताच सेनेत प्रवेश केलेल्या महाबळेश्वरच्या डी. एम. बावळेकर यांनाही आमदार व्हायचे आहे. त्यामुळे येथेही मोठी डोकेदुखी आहे. गेल्यावेळी वाईतून ‘रिपाइं’चे अशोक गायकवाड लढले होते. आता तर ‘रिपाइं’ महायुतीमध्ये आहे. त्यामुळे त्यांचाही वाईवर दावा राहणार आहे.
कोरेगाव मतदार संघ गेल्यावेळी शिवसेनेकडे होता. यावेळी भाजपने दावा केला आहे. येथून भाजपच्या कांताताई नलवडे यांनी उमेदवारी मागितली आहे. सेनेकडून हणमंत चवरे, पुरुषोत्तम माने, चंद्रकांत जाधव इच्छुक आहेत. ही यादी वाढतच असतानाच स्वाभिमानीनेही लढण्याची घोषणा केली आहे. (प्रतिनिधी)