Satara: एक कोटीच्या मांडुळाची तस्करी; तिघांना अटक, तिघेही आरोपी रायगड जिल्ह्यातील
By दीपक शिंदे | Published: February 18, 2024 10:43 AM2024-02-18T10:43:26+5:302024-02-18T10:43:49+5:30
Satara Crime News: तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची किंमत असलेल्या मांडुळाची तस्करी करणाऱ्या तिघांना तळबीड, ता. कऱ्हाड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मांडूळ हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई दि. १७ रोजी सायंकाळी करण्यात आली.
- दीपक शिंदे
सातारा - तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची किंमत असलेल्या मांडुळाची तस्करी करणाऱ्या तिघांना तळबीड, ता. कऱ्हाड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मांडूळ हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई दि. १७ रोजी सायंकाळी करण्यात आली. रूपेश अनिल साने (वय २५, रा. आड, ता. पोलादपूर, जि. रायगड), अनिकेत विजय उत्तेकर (वय २७), आनंद चंद्रकांत निकम (वय ३५, दोघेही रा. कापडखुर्दे, ता. पोलादपूर, जि. रायगड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत तळबीड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तळबीड पोलिस शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड सातारा रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी वराडे या गावामध्ये जय शिवराय या हाॅटेलजवळ काही लोक मांडूळ विक्रीसाठी येणार आहेत, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले आणि पोलिस काॅन्स्टेबल नीलेश विभुते यांना मिळाली. त्यानंतर तळबीड पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तातडीने सापळा लावला. काही वेळातच तेथे तिघेजण दुचाकीवरून तेथे आले. त्यांच्याजवळ एक बाॅक्स होता. त्या बाॅक्सची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये मांडूळ आढळून आले. पोलिसांनी या तिघांकडे कसून चाैकशी केली असता त्यांनी हे मांडूळ आनंद चंद्रकांत निकम यांच्या शेतात काम करीत असताना दहा दिवसांपूर्वी सापडले. या मांडुळाची किंमत एक कोटी १० लाख रुपये ठरली असून, विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी कबूल केले. मात्र, कोणाला विकणार होते, हे अद्याप समोर आले नाही. कऱ्हाड येथील वनक्षेत्रपाल अधिकाऱ्यांकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने जप्त केलेले मांडूळ देण्यात आले आहेेेेे.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले, पोलिस उपनिरीक्षक अशोक मदने, सहायक फाैजदार काळे, खराडे, पोलिस काॅन्स्टेबल आप्पा ओंबासे, संदेश दीक्षित, नीलेश विभुते, सुशांत कुंभार, महेश शिंदे आदींनी या कारवाई भाग घेतला.