साताऱ्याचा पारा पुन्हा घसरला, १५ अंशाची नोंद; थंडीतही चढ-उतार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 05:36 PM2022-11-09T17:36:49+5:302022-11-09T17:37:14+5:30
सातारकरांना यावर्षी लवकर थंडीला सामोरे जावे लागले
सातारा : जिल्ह्यात दिवाळीच्यावेळी गारठा वाढला होता. मात्र, मागील सहा दिवसांपासून किमान तापमान कधी कमी, तर कधी अधिक नोंद होत आहे. यामुळे थंडीतही चढ-उतार होत आहे, तर साताऱ्याचा पारा पुन्हा घसरला असून मंगळवारी १५ अंशाची नोंद झाली.
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस पडतो. त्यामुळे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यात थंडी जाणवण्यास सुरुवात होते. मात्र, यावर्षी दहा दिवस अगोदरच थंडीला सुरुवात झाली आहे. कारण, ऑक्टोबर महिना असतानाही ‘हिट’ जाणवली नाही. ऑक्टोबर महिन्याच्या २० तारखेपर्यंत परतीचा पाऊसच पडत होता. यामुळे पावसाळी वातावरण होते. त्यातच सतत साडेचार महिने पाऊस असल्याने जिल्हावासीयांना नकोसे झालेले, पण दिवाळीच्या अगोदर काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उघडीप राहिली. त्यामुळे वातावरणात एकदम बदल होऊन पारा घसरला.
जिल्ह्यात दिवाळीची धामधूम सुरू असतानाच गुलाबी थंडीची चाहूल लागली. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच थंडी जाणवू लागली होती. त्यातच शीतलहर असल्याने दिवसाही गारठा चांगला जाणवू लागला. त्यानंतरही आठ दिवस जिल्ह्यात चांगलीच थंडी जाणवत होती. किमान तापमान १५ अंशाच्या खाली आले होते. सातारा शहराचा पारा तर १४ अंशाच्या दरम्यान राहिला होता. त्यामुळे सातारकरांना यावर्षी लवकर थंडीला सामोरे जावे लागले. असे असतानाच सहा दिवसांपासून किमान तापमान वाढले आहे. साताऱ्यातील किमान तापमान तर २० अंशावर गेले होते. त्यानंतर पारा काही अंशाने घसरला. मंगळवारी तर १५ अंशाची नोंद झाली, तर महाबळेश्वरचा पारा १८.०६ अंश होता.
सातारा शहरातील किमान तापमान असे :
दि. २५ ऑक्टोबर १४.०१, २६ ऑक्टोबर १४.०८, २७ ऑक्टोबर १५.०१, दि. २८ ऑक्टोबर १४.०८, २९ ऑक्टोबर १५.०२, ३० ऑक्टोबर १४.०३, ३१ ऑक्टोबर १४.०२, दि. १ नोव्हेंबर १४.०४, २ नोव्हेंबर १७.०३, ३ नोव्हेंबर २०.०४, दि. ४ नोव्हेंबर १७.०९, ५ नोव्हेंबर १६.०३, ६ नोव्हेंबर १६.०९ , ७ नोव्हेंबर १५.०५ आणि ७ नोव्हेंबर १५.