साताऱ्यात रिक्षांचे मीटर डाऊन !
By admin | Published: April 2, 2017 03:37 PM2017-04-02T15:37:32+5:302017-04-02T15:37:32+5:30
ठरवून होतो प्रवास : चालकांबरोबर प्रवाशांचीही डिजिटल मीटरला नापसंती
आॅनलाईन लोकमत
सातारा : प्रवासी रिक्षांसाठी नव्याने बसविलेल्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीटरमध्ये अनेक त्रुटी असल्याने चालकांबरोबर प्रवाशांचाही या मीटरवर विश्वास बसत नाही. शहरात फिरणाऱ्या सर्वच रिक्षांचे मीटर सध्या बंद अवस्थेत आहेत. यामुळे प्रवासीही रिक्षात बसण्यापूर्वी अमुक ठिकाणी किती घेणार? असा प्रश्न विचारून रक्कम ठरवत आहेत.
प्रवासी रिक्षांसाठी नवीन डिजिटल मीटर सक्ती केल्यामुळे रिक्षा व्यावसायिकांनी पदरमोड करत ही मीटर बसविली. तरीही शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता खड्ड्यात वाहने आदळले की हे मीटर बंद होत आहे. अनेक वेळा चुकीची खाचखळग्यांच्या रस्त्यामुळे मीटर बंद चालू होऊन रिडिंग चुकीचे दाखविते. तर काहीवेळा बॅटरी चार्ज नसल्याने मीटर सुरू होत नाही तर अनेकवेळा मधूनच पहिल्यापासून रीडिंगला सुरुवात होते.यामुळे चालकाबरोबर प्रवाशांची वारंवार हमरी-तुमरी होते. मीटर सुरू केले तरी प्रवासी भाडे ठरवूनच प्रवास करत असल्याने मीटरपायी हजारो रुपये गुंतून पडल्याचे रिक्षा व्यावसायिकांनी सांगितले.
नव्याने बसविण्यात आलेले मीटरचा पहिला टप्पा दीड किलोमीटरचा आहे. याचाही फटका रिक्षा व्यावसायिकांना बसत आहे. तर प्रवासी देखील शहरातून प्रवास करण्यासाठी प्रतिप्रवासी पैसे आकारत आहेत. त्यामुळे सध्या शहरातील बहुतांशी भागात शहरी प्रवासी सीटप्रमाणे प्रवास क रण्याचे प्रमाण वाढले असल्याने मीटरची आवश्यता लागत नाही. शहरी प्रवासी पद्धतीमुळे रिक्षाचा प्रवासी वर्ग वाढला असून, यातून व्यावसायिक व प्रवाशांमधील तक्रारीही कमी झाल्या असल्याचा रिक्षाचालकांना अनुभव आहे.
जुन्या मीटरची मागणी
नवीन मीटरचा पहिला टप्पा दीड किलोमीटरचा आहे. साताऱ्याचे रस्ते पाहता एवढा टप्पा होत नाही. त्यामुळे जुन्या मीटरप्रमाणे १ किलोमीटरचा पहिला टप्पा करावा, अशी मागणी काही रिक्षाचालकांनी केली आहे. पुण्यात सिग्नल अधिक असल्याने तेथे चालू मीटरमध्ये रिक्षा थांबून राहतात. त्यामुळे पुण्याला नवीन मीटर व्यावसायिकांना परवडतात, असेही मत काही चालकांनी व्यक्त केले.