सातारा : मोबाईल असोसिएशनचा पोलीस ठाण्यावर मोर्चा, चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 02:18 PM2018-07-21T14:18:59+5:302018-07-21T14:22:05+5:30
दुकानदारावर चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत साताऱ्यातील मोबाईल असोसिएशनच्या वतीने शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनी भेटण्यास नकार दिल्याने दुकानदार संतप्त झाले होते.
सातारा : दुकानदारावर चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत साताऱ्यातील मोबाईल असोसिएशनच्या वतीने शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनी भेटण्यास नकार दिल्याने दुकानदार संतप्त झाले होते.
होलसेल आणि रिटेल दुकानदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. मोबाईलचे पार्ट विकण्यावरून एका रिटेल आणि होलसेल दुकानदाराची मारामारी झाली होती. यावरून पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर मोबाईल असोसिएशनचे पदाधिकारी आणि दुकानदारांनी गर्दी केली होती.
पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना भेटण्यासाठी सर्वजण पोलीस ठाण्यात आले होते. परंतु सारंगकर तेथे उपस्थित नसल्याने दुकानदार संतप्त झाले होते. सारंगकर यांनी यासंदर्भात दुसऱ्या अधिकाऱ्यांना भेटा, असे सांगितले. त्यामुळे आणखीनच दुकानदार संतप्त झाले. काहीजणांनी या प्रकरणाची थेट पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना माहिती दिली.