साताऱ्यात महिलेचा महिलेकडून विनयभंग, पोलीस ठाण्यातील पहिलीच केस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 04:13 PM2019-03-19T16:13:58+5:302019-03-19T16:15:23+5:30
आत्तापर्यंत आपण पुरुषांकडून महिलेचा विनयभंग झाल्याचे पाहात आलो आहोत. मात्र, एका महिलेकडूनच महिलेचा विनयभंग होण्याची दुर्मीळ घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंग प्रकरणी चक्क एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
सातारा: आत्तापर्यंत आपण पुरुषांकडून महिलेचा विनयभंग झाल्याचे पाहात आलो आहोत. मात्र, एका महिलेकडूनच महिलेचा विनयभंग होण्याची दुर्मीळ घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंग प्रकरणी चक्क एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी फलटण तालुक्यातील एका पस्तीस वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. साताऱ्यातील उपगनरामध्ये राहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेने याची तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित पीडित महिला आणि संशयित आरोपी महिला एकमेकींच्या ओळखीच्या आहेत. काही महिन्यांपासून संबंधित महिलेकडून फेसबुक, व्हॅट्सअॅपद्वारे मेसेज करून पीडित महिलेला मानसिक त्रास दिला जात होता. हा सारा प्रकार २०१६ पासून सुरू असल्याचे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले आहे. तसेच एके दिवशी समक्ष भेटून लैंगिक बदनामीकारक आरोपही त्या महिलेने केले.
या प्रकाराला कंटाळून पीडित महिला आणि तिच्या पतीने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. अशा प्रकारचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात पहिल्यांदाच दाखल झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी स्वत:कडे घेतला आहे.