सातारा : खाद्यपदार्थ ठरतायेत माकडांसाठी जीवघेणा, वाहन धडकेत माकडाचा मृत्यू : उत्साही पर्यटकांचा खेळ प्राण्यांच्या जिव्हारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:11 PM2018-01-08T13:11:50+5:302018-01-08T13:16:16+5:30
सातारा तालुक्याच्या घनदाट जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर माकडांचे कळप रस्त्याकडेला खाद्याच्या प्रतीक्षेत बसलेले असतात. ही माकडे यवतेश्वर घाट व बोरणे घाटात मोठ्या प्रमाणात दिसतात. या माकडांना अनेक प्रवासी प्राणी प्रेमातून खाद्यपदार्थ टाकत असतात; मात्र हेच खाद्यपदार्थ खाण्यासाठी रस्त्यावर अपघात होऊन माकडांच्या जीवावर उठत आहे.
गोडोली (सातारा) : सातारा तालुक्याच्या घनदाट जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर माकडांचे कळप रस्त्याकडेला खाद्याच्या प्रतीक्षेत बसलेले असतात. ही माकडे यवतेश्वर घाट व बोरणे घाटात मोठ्या प्रमाणात दिसतात. या माकडांना अनेक प्रवासी प्राणी प्रेमातून खाद्यपदार्थ टाकत असतात; मात्र हेच खाद्यपदार्थ खाण्यासाठी रस्त्यावर अपघात होऊन माकडांच्या जीवावर उठत आहे.
अनेकजण प्राणीमात्रांवर दया करण्याच्या हेतूने माकडांना खाद्य वेफर्स, बिस्किटे, पाव, पॉपकॉर्न, केळी यासारखे खाद्यपदार्थ टाकतात. मात्र बऱ्याचदा हेच प्राणीप्रेम त्या माकडांच्या मृत्यूला कारण ठरत आहे. खाद्यपदार्थ खाण्यासाठी रस्त्यावर आलेल्या माकडांचा सुसाट वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
माकडांची शरीररचना जंगलातील फळे, कंदमुळे आणि निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या आहाराशी सुसंगत असते. त्यांच्या पचनयंत्रणेची निश्चित अशी साखळी कार्यरत असते. मात्र प्रवाशांकडून टाकण्यात येणाऱ्या पिष्टमय पदार्थांमुळे माकडांच्या पचन संस्थेवर विपरित परिणाम घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.