पावसानं शिवार भिजवलं; काळ्या मातीच्या कुशीत बियाणं रुजवलं!
By नितीन काळेल | Published: June 13, 2024 06:57 PM2024-06-13T18:57:45+5:302024-06-13T18:58:51+5:30
साडे चार हजार हेक्टवर पेरणी; भात लागणीस प्रारंभ; बाजरी, मक्याची पेर
सातारा : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस वेळेत सुरू झाल्याने खरीप हंगामातील पेरणीस सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात साडे चार हजार हेक्टरवर पेर झाली आहे. बाजरी, मका या पिकांचा प्रामुख्याने पेरणीत समावेश आहे. काही भागात भाताची लागणही सुरू झाली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९३ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर, भात ४३ हजार ९७८ हेक्टर, भुईमूग २९ हजार ४३५, खरीप ज्वारीचे ११ हजार १५२ हेक्टर तसेच मका १५हजार १९०, तर तूर, मूग, उडदाचे क्षेत्र कमी राहते. जिल्ह्यात यावर्षी पावसाला वेळेत सुरुवात झाली आहे. तसेच आतापर्यंत सर्वदूर पाऊस झाला आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी खरीप पेरणीसाठी वापसा आलेला नाही. त्यामुळे पेरणी खोळंबली आहे. तरीही शेतकऱ्यांनी माळरानावरील आणि वापसा आलेल्या रानात पेरणीस सुरुवात केली आहे.
खरीप हंगामातील पेरणी आतापर्यंत दीड टक्के झाली आहे. ४ हजार ३२९ हेक्टरवर पेर पूर्ण आहे. यामध्ये १ हजार ७८४ हेक्टरवर भात लागण झाली आहे. सातारा, पाटण, कऱ्हाड, वाई तालुक्यात लागणीला वेग आला आहे. बाजरीची ५ टक्के पेरणी झाली आहे. बाजरीचे सर्वाधिक क्षेत्र माण तालुक्यात ३१ हजार हेक्टरवर राहण्याचा अंदाज आहे. सध्या जिल्ह्यातील माणमध्येच पेर सुरू आहे. खटाव, फलटण, खंडाळा आणि कोरेगाव तालुक्यात सुरुवात झालेली नाही. ज्वारी आणि मका पिकाच्या पेरणीलाही सुरुवात झाली आहे. पण, पाऊस पडत असल्याने पेरणीला वेग आलेला नाही.
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यामुळे यंदाही क्षेत्र अधिक राहण्याचा अंदाज आहे. सध्या जिल्ह्यात ९६८ हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली. टक्केवारीत हे प्रमाण एक इतकेच आहे. तर सोयाबीनची सातारा, पाटण, कऱ्हाड, कोरेगाव या तालुक्यातच पेर सुरू असल्याचे दिसून येत आहे. भुईमुगाची पेरणी दोन टक्के क्षेत्रावर झाली आहे. पाटण तालुक्यात ७०६ हेक्टरवर सध्या भुईमूग पेरणी पूर्ण झाली आहे.
खरीपचे सर्वाधिक क्षेत्र पाटणमध्ये ४६ हजार हेक्टर
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप हंगामात पेरणी होते. सर्वाधिक क्षेत्र हे पाटण तालुक्यात ४६ हजार ३६७ हेक्टर राहण्याचा अंदाज आहे. यानंतर खटाव तालुक्यात ४५ हजार ८९६ हेक्टर, माण ३९ हजार ६०६, कऱ्हाड ३८ हजार ५७७, सातारा तालुका ३१ हजार ६५२, वाई १७ हजार २४२, जावळी १८ हजार २२०, कोरेगाव २० हजार ७६४, खंडाळा तालुका १० हजार ५६ आणि महाबळेश्वर तालुक्यात ४ हजार २२६ हेक्टर क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे.