सातारा पालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या अखेर मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:29+5:302021-07-08T04:26:29+5:30
सातारा : सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम पालिका कर्मचाऱ्यांच्या फंडात व्याजासहित जमा करण्याची ग्वाही बुधवारी नगराध्यक्षा माधवी कदम व ...
सातारा : सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम पालिका कर्मचाऱ्यांच्या फंडात व्याजासहित जमा करण्याची ग्वाही बुधवारी नगराध्यक्षा माधवी कदम व मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली. यानंतर सलग दोन दिवसांपासून सुरू असलेले काम बंद आंदोलन कर्मचाऱ्यांकडून स्थगित करण्यात आले.
सातारा पालिकेच्या ४१३ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी, अशी मागणी सातारा म्युनिसिपल कामगार युनियनच्या (लाल बावटा) वतीने करण्यात आली होती. मात्र लेखा विभागाने नियमांचा पाढा वाचल्याने रक्कम रोखीने द्यायची की फंडात जमा करायची याबाबत पालिकेकडून ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत काम बंद आंदोलन पुकारले. सोमवार व मंगळवारी सलग दोन दिवस पालिकेचे कामकाज बंद होते. मात्र, पालिका प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता.
नगराध्यक्षा माधवी कदम यांनी मंगळवारी कर्मचारी संघटनेला फरकाची रक्कम फंडात जमा करण्याची ग्वाही दिली होती. तसेच याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वस्तही केले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी कर्मचारी संघटनेने पदाधिकारी व सदस्यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेनंतर सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची दोन वर्षांची रक्कम व्याजासहित कर्मचाऱ्यांच्या फंडात जमा केली जाईल, कर्मचाऱ्यांना गरजेनुसार ही रक्कम काढता येईल, आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन देत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केले. यानंतर कर्मचाऱ्यांकडून आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, सलग दोन दिवस आरोग्य विभाग वगळता इतर सर्वच विभागांचे कामकाज बंद राहिल्याने याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जरूर आंदोलन करावे; परंतु सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
फोटो : ०७ सातारा पालिका
सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी वेतन आयोगाच्या फरकाबाबत नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याशी चर्चा केली.