सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, मारहाणीच्या घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 02:45 PM2018-12-20T14:45:47+5:302018-12-20T14:48:49+5:30
सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी प्रशांत निकम यांना चार व्यावसायिकांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेला विरोध दर्शवत गुरुवारी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. शासकीय कामात अडथळा निर्माण करून मारहाण करणाऱ्यांवर वेळीच आवर घालावा व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली.
सातारा : नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी प्रशांत निकम यांना चार व्यावसायिकांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेला विरोध दर्शवत गुरुवारी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. शासकीय कामात अडथळा निर्माण करून मारहाण करणाऱ्यांवर वेळीच आवर घालावा व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली.
मारहाण घटनेच्या निषेधार्थ पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निषेध सभा पार पडली. यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रशासनापुढे आपली भूमीका स्पष्ट केली. याप्रसंगी नगराध्यक्षा माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, नगरसेवक धनंजय जांभळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
अतिक्रमण विभागाचे लिपिक प्रशांत निकम यांना झालेली मारहाण ही निंदनीय घटना आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडू लागल्याने व्यावसायिकांची मुजोरी वाढत चालली आहे. त्यांच्यावर कोणाचाही अंकुश राहिला नाह.
आम्ही कोणाच्या घरचे काम करीत नाही. शासकीय नियमानुसारच अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करतो. मारहाणीसारख्या घटना अशाच घडत राहिल्या तर आम्ही काम कसे करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाने शहरातील सर्व बेकायदा अतिक्रमणे हटविण्याची परवानगी द्यावी व मारहाण करणाऱ्या व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली.