सातारा पालिका दुसऱ्या दिवशीही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:06+5:302021-07-07T04:49:06+5:30
सातारा : सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम रोखीने देण्याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने मंगळवारीदेखील पालिका कर्मचाऱ्यांकडून ...
सातारा : सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम रोखीने देण्याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने मंगळवारीदेखील पालिका कर्मचाऱ्यांकडून बंद पाळण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी पालिकेचे कामकाज बंद राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
सातारा पालिकेच्या ४१३ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची एकूण १ कोटी २८ लाख रुपये रक्कम अदा करावयाची आहे. ही रक्कम फंडात जमा न करता ती रोखीने देण्यात यावी, अशी मागणी सातारा म्युनिसिपल कामगार युनियनच्या (लाल बावटा) वतीने करण्यात आली होती. मात्र, लेखा विभागाने नियमांचा पाढा वाचल्याने रक्कम रोखीने द्यायची की फंडात जमा करायची याबाबत पालिकेकडून ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे सोमवारी कर्मचारी संघटनांकडून बंद पुकारण्यात आला. पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवत या आंदोलनात सहभाग नोंदविला. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या दालनात झालेल्या बैठकीतही या प्रश्नाबाबत कोणताच ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे मंगळवारी देखील कर्मचाऱ्यांकडून काम बंद ठेवण्यात आले.
कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यापुढे आपली कैफियत मांडली. नगराध्यक्षा म्हणाल्या, ‘वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम रोखीने देण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आरोग्य विभाग वगळता इतर सर्वच विभागांचे कामकाज दिवसभर बंद राहिल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
(चौकट)
पुढील दिशा ठरवणार
सातारा म्युनिसिपल कामगार युनियनचे (लाल बावटा) सरचिटणीस श्रीरंग घाडगे यांनी युनियनचे अध्यक्ष अॅड. धैर्यशील पाटील यांच्याशी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील इतर पालिकांनी फंडाची रक्कम रोखीने अदा केली आहे. त्याच धर्तीवर सातारा पालिकेला देखील रक्कम अदा करता येऊ शकते की नाही याची पडताळणी केली जाईल. याबाबत अन्य पालिकांकडून माहिती घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे घाडगे यांनी सांगितले.
फोटो : ०६ सातारा पालिका
सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याशी सातव्या वेतन आयोगाच्या फरकाबाबत सविस्तर चर्चा केली. (छाया : जावेद खान)