सातारा पालिकेला कारवाईचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:43 AM2021-05-20T04:43:03+5:302021-05-20T04:43:03+5:30
कारवाईचा विसर सातारा : पालिकेकडून मास्कचा वापर न करणा-यांवर सुरू करण्यात आलेली कारवाई मोहीम गेल्या काही दिवसांपासून थंडावली आहे. ...
कारवाईचा विसर
सातारा : पालिकेकडून मास्कचा वापर न करणा-यांवर सुरू करण्यात आलेली कारवाई मोहीम गेल्या काही दिवसांपासून थंडावली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक शहरात मास्कविना निर्धास्तपणे वावरत आहेत. मास्क न वापरणा-यांवर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्गमित केले आहे. पालिकेकडून प्रारंभीचे काही दिवस ही कारवाई मोहीम प्रभावीपणे राबविली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम पूर्णपणे थंडावली आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना नागरिक संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करून बाजारपेठेत निर्धास्तपणे वावरत आहेत.
समर्थ मंदिर चौकात
खड्ड्यांचे साम्राज्य
सातारा : पावसाळा सुरू झाल्यापासून सातारा शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आलेल्या शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय होऊ लागली आहे. सध्या बोगदा ते राजवाडा या मार्गावर असलेल्या समर्थ मंदिर चौकातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे या चौकात दुचाकी वाहने आदळण्याच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. या खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या वळवाच्या पावसाने सर्वत्र उघडीप दिली असून, पालिका व बांधकाम विभागाने शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पावसामुळे शेतीची
कामे खोळंबली
शेंद्रे : सातारा तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या वळवाच्या पावसामुळे ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणची शेती जलमय झाली असून, उन्हाळी पिकांनाही मोठा फटका बसला आहे. पाऊस-पाण्यामुळे सध्या शिवारातील कामे खोळंबली असून, याची शेतक-यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. सततच्या पावसामुळे सर्वत्र थंडीची तीव्रता वाढली आहे.