सातारा नगरपालिकेत आता महिलाच कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 07:14 PM2021-01-11T19:14:53+5:302021-01-11T19:15:58+5:30
Muncipal Corporation Satara- सातारा पालिकेच्या सभापती निवडी बिनविरोध झाल्या असून, पालिकेचा कारभार आता महिला नगरसेविकांच्या खांद्यावर सोपविण्यात आला आहे. सातारा विकास आघाडीचे प्रमुख खासदार उदयनराजे भोसले यांनी नियोजन, बांधकाम, आरोग्य, महिला बालकल्याण व पाणी पुरवठा सभापतिपदी महिला नगरसेविकांची निवड करून सर्वांना सुखद धक्का दिला. त्यामुळे नगराध्यक्षांसह पालिकेत महिला राज निर्माण झाले आहे.
सातारा : सातारा पालिकेच्या सभापती निवडी बिनविरोध झाल्या असून, पालिकेचा कारभार आता महिला नगरसेविकांच्या खांद्यावर सोपविण्यात आला आहे. सातारा विकास आघाडीचे प्रमुख खासदार उदयनराजे भोसले यांनी नियोजन, बांधकाम, आरोग्य, महिला बालकल्याण व पाणी पुरवठा सभापतिपदी महिला नगरसेविकांची निवड करून सर्वांना सुखद धक्का दिला. त्यामुळे नगराध्यक्षांसह पालिकेत महिला राज निर्माण झाले आहे.
आगामी पालिका निवडणुकांचा रंग पाहता शेवटच्या टर्मसाठी उदयनराजे भोसले कोणाला संधी देणार? याची प्रचंड उत्सुकता होती. तर नेहमीच्या धक्कातंत्र शैलीत उदयनराजे यांनी पालिकेतल्या महिला नगरसेवकांवर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले.
विद्यमान आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांचा अपवाद वगळता बांधकाम विभागासाठी सिध्दी पवार, महिला व बाल कल्याण विभागासाठी रजनी जेधे, पाणीपुरवठा विभागासाठी सीता हादगे व नियोजन विभागासाठी स्नेहा नलावडे यांनी सकाळी अकरा वाजता नामनिर्देशन पत्र पीठासन अधिकाऱ्यांकडे दाखल केले. तत्पूर्वी रिक्त जागांची माहिती पालिका सभागृहात आयोजित विशेष सभेमध्ये देण्यात आली.
अर्ज माघारीसाठी उमेदवारांना साडेबारा ते पावणे एक या दरम्यान पंधरा मिनिटाची मुदत देण्यात आली. दुपारी एक वाजता पीठासन अधिकाऱ्यांनी पाच विषय समित्यांच्या नूतन सभापतींची घोषणा केली. स्थायी समितीच्या सदस्यपदी निशांत पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे संधी देण्यात आली.
नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अॅड. दत्ता बनकर यांनी नूतन सभापतींचे कौतुक केले. नगराध्यक्षाच्या साथीला आता सर्वच महिला सभापतींची फळी उभी राहिल्याने सातारा पालिकेत खºया अर्थाने महिलाराज अवतरले आहे.