सातारा पालिकेत आता महिलाच कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:40 AM2021-01-13T05:40:13+5:302021-01-13T05:40:13+5:30
सातारा : सातारा पालिकेच्या सभापती निवडी सोमवारी बिनविरोध झाल्या असून, पालिकेचा कारभार महिला नगरसेविकांवर सोपविण्यात आला आहे. सातारा विकास ...
सातारा : सातारा पालिकेच्या सभापती निवडी सोमवारी बिनविरोध झाल्या असून, पालिकेचा कारभार महिला नगरसेविकांवर सोपविण्यात आला आहे. सातारा विकास आघाडीचे प्रमुख खासदार उदयनराजे भोसले यांनी नियोजन, बांधकाम, आरोग्य, महिला, बालकल्याण व पाणी पुरवठा सभापतिपदी महिला नगरसेविकांची निवड करून सर्वांना सुखद धक्का दिला.
आगामी पालिका निवडणुकांचा रंग पाहता, शेवटच्या टर्मसाठी उदयनराजे भोसले कोणाला संधी देणार, याची प्रचंड उत्सुकता होती. यावेळी ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवकांना संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांनी नेहमीच्या धक्कातंत्र शैलीत सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला. यावेळी त्यांनी पालिकेतल्या महिला नगरसेवकांवर विश्वास दाखविला असून, पालिकेची सूत्रे त्यांच्या ताब्यात दिली.
विद्यमान आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांना मुदतवाढ देण्यात आली, तर बांधकाम विभागासाठी सिध्दी पवार, महिला व बालकल्याण विभागासाठी रजनी जेधे, पाणीपुरवठा विभागासाठी सीता हादगे व नियोजन विभागासाठी स्नेहा नलावडे यांनी सकाळी अकरा वाजता नामनिर्देशन पत्र पीठासन अधिकाऱ्यांकडे दाखल केले. तत्पूर्वी रिक्त जागांची माहिती पालिका सभागृहात आयोजित विशेष सभेमध्ये देण्यात आली.
अर्ज माघारीसाठी उमेदवारांना साडेबारा ते पावणे एक यादरम्यान पंधरा मिनिटांची मुदत देण्यात आली. दुपारी एक वाजता पीठासन अधिकाऱ्यांनी पाच विषय समित्यांच्या नूतन सभापतींची घोषणा केली. स्थायी समितीच्या सदस्यपदी निशांत पाटील यांना अपेक्षेप्रमाणे संधी देण्यात आली. नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अॅड. दत्ता बनकर यांनी नूतन सभापतींचे कौतुक केले. नगराध्यक्षांच्या साथीला आता सर्वच महिला सभापतींची फळी उभी राहिल्याने सातारा पालिकेत खऱ्याअर्थाने महिलाराज अवतरले आहे.
फोटो : ११ सातारा पालिका
सातारा पालिकेतील सभापती निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. या निवडीनंतर नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यासमवेत नूतन सभापतींनी अशा पद्धतीने आनंद साजरा केला. (छाया : जावेद खान)