सातारा : प्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी केला पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:45 PM2018-04-20T13:45:25+5:302018-04-20T13:45:25+5:30
भावी आयुष्याची स्वप्न उराशी बाळगून प्रियकरासोबत लग्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियकराने तिचा घात केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. मांढरदेव घाटामध्ये खून झालेल्या महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांना ही धक्कादायक माहिती समजली.
सातारा : भावी आयुष्याची स्वप्न उराशी बाळगून प्रियकरासोबत लग्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियकराने तिचा घात केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. मांढरदेव घाटामध्ये खून झालेल्या महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांना ही धक्कादायक माहिती समजली.
बानू कोकरे (वय २३, रा. भिवंडी, मुंबई) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी वाई तालुक्यातील मांढरदेव घाटामध्ये बानू कोकरेचा गळा चिरून खून करण्यात आला होता. महिलेच्या हातावर केवळ बानू असे गोंधले होते. यावरून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. वाई परिसरातील सर्व हॉटेल आणि लॉजमध्ये जाऊन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले.
यावेळी संबंधित महिला व तिच्यासोबत अन्य एकजण असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर त्यांचा पत्ता लॉजमधून घेऊन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. सोशल मीडियावर बानूचा फोटो व्हायरल झाल्यानंतर एका व्यक्तीने पोलिसांना आरोपीबाबत माहिती दिली. त्यानंतर साताऱ्यांतील पोलीस मुंबई (भिवंडी) येथे पोहोचले.
आरोपीला घरातून अटक केल्यानंतर साताऱ्यात आणण्यात आले आहे. त्याच्याकडे कसून चौकशी पोलीस करत असताना त्याने प्रेम विवाह केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा प्रकार केला असल्याची कबुली दिली.
मात्र, खून करण्यापाठीमागचे नेमके कारण अद्याप त्याने पोलिसांना सांगितले नसून पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. पत्नीचा खून करण्यासाठी त्याच्यासोबत अन्य काहीजण असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याचे नाव सध्या तरी गोपनिय ठेवले आहे.