Satara: जमीन विक्रीच्या कमीशनमधून खून; दोन महिन्यानंतर घटना उघडकीस
By नितीन काळेल | Published: October 26, 2023 02:19 PM2023-10-26T14:19:15+5:302023-10-26T14:19:37+5:30
मृतदेह खंडळा तालुक्यात पुरला : सातारा शहर ठाण्यात चौघांवर गुन्हा
सातारा : जमीन विक्री कमिशनच्या वादातून एकाचा खून करुन मृतदेह खंडाळा तालुक्यात पुरण्यात आला. मात्र, आॅगस्ट महिन्यातील हा प्रकार दोन महिन्यानंतर उघडकीस आला असून याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी शहर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनुसार शिवाजी नामदेव शिंदे (रा. सैदापूर, सातारा), अक्षण चव्हाण (पूर्ण नाव नाही, कोंडवे, ता. सातारा), विशाल उर्फ भैय्या खवळे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सतारा) आणि सुमीत भोसले (पूर्ण नाव नाही, रा. पाडेगाव, ता. खंडाळा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, संशियत शिवाजी शिंदे याचे संदीप संकपाळ यांच्याबरोबर जमीन विक्री कमीशनवरुन वाद झाला होता. यातून चिडून संदीप संकपाळ यांना २१ आॅगस्ट २०२३ रोजी साताऱ्यातील पोवई नाक्यावरुन संशयितांनी नेले. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी दोनच्या सुमारास संकपाळ यांचा गळा आवळून खून करण्यात आला. तर पुरावा नष्ट करण्यासाठी संदीप संकपाळ यांचा मृतदेह पाडेगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीत सर्दचा ओढाजवळ वघळीत पुरून पुरावा नष्ट करण्याच प्रयत्न करण्यात आला. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.