सातारा : कालवडेत एकाचा निर्घृण खून, गावात खळबळ : खिंडीत आढळला मृतदेह; पोलिसांकडून कसून तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:07 PM2018-01-05T14:07:17+5:302018-01-05T14:10:39+5:30
कालवडे, ता. कऱ्हाड येथे रस्त्यालगत एकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. संबंधिताचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.
कऱ्हाड : कालवडे, ता. कऱ्हाड येथे रस्त्यालगत एकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. संबंधिताचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.
बबन हिंदुराव गाडे (रा. कालवडे, ता. कऱ्हाड ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कालवडे ते नांदगाव जाणाºया रस्त्यावर डोंगरातील खिंडीत एकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी पोलिसांना दिली.
माहिती मिळताच कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी चौकशी केली असता संबंधित व्यक्तीची ओळख पटली. त्याचे नाव बबन गाडे असल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले.
गाडे यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा आहेत. तसेच गुरुवारी रात्री दोघांनी त्यांना घरातून बोलावून नेले होते. त्यानंतर ते घरी परत आले नाहीत. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेहच आढळून आला, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
मृतदेहावर असलेल्या जखमा व नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार बबन गाडे यांचा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार तपास केला जात आहे.
दुपारी गाडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, उपअधीक्षक नवनाथ ढवळे, निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाकडून घटनास्थळी तपास करण्याचे काम सुरू आहे.
झाडीत आढळला महिलेचा मृतदेह
कालवडे येथे खुनाची घटना समोर आली असताना आटके गावच्या हद्दीत एका महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. संबंधित महिलेचे वय सुमारे ३५ वर्षे असून, तिच्या अंगात सलवार, कुर्ता आहे.
तिचा मृत्यू आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. आटके गावच्या हद्दीत पाचवडेश्वर शिवारात झाडीमध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. महिलेची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.