सातारा : प्लास्टिक निर्मूलनासाठी नागठाणे ग्रामपंचायतीचे एक पाऊल पुढे, श्रमदानातून ५५ पिशव्या प्लास्टिक कचरा गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:51 AM2017-12-26T11:51:00+5:302017-12-26T11:54:28+5:30
सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला प्लास्टिक मुक्त जिल्हा करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र दि. २८ डिसेंबरपासून प्लास्टिक मुक्ती अभियानास प्रारंभ होत आहे.
काशीळ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला प्लास्टिक मुक्त जिल्हा करण्याचा निर्धार केला आहे.
या पार्श्वभूमीवर सर्वत्र दि. २८ डिसेंबरपासून प्लास्टिक मुक्ती अभियानास प्रारंभ होत आहे. याच विषयाचा धागा पकडून नागठाणे ग्रामपंचायतीने प्लास्टिक मुक्तीसाठी एक पाऊल पुढे टाकले असून, गावात स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली.
या मोहिमेंतर्गत ग्रामस्थांच्या वतीने यात्रा पटांगणाची साफसफाई करण्यात आली. या पटांगणावर मोठ्या प्रमाणात साचलेला प्लास्टिक कचरागोळा करण्यात आला.
पटांगणावरून तब्बल ५५ पिशव्या प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये, ग्रामस्थांनीही कापडी पिशवीचा वापर करावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
ग्रामस्थांनी आपल्या घरातील कचऱ्यांचे ओला व सुका असे वर्गीकरण करावे. तसेच तो घंटागाडीतच टाकावा. कचरा इतरत्र टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा सरपंच विष्णू साळुंखे यांनी दिला.
सरपंच महादेव साळुंखे व ग्रामविकास अधिकारी सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र साळुंखे, बापूराव मोहिते, अमीन शिकलगार, रामकृष्ण विद्या मंदिर, संत निरंकारी मंडळ, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.