Satara: माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान उत्साहात, लाखो भाविकांची उपस्थिती, वैष्णवांचा मेळा लोणंदनगरीत विसावला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 04:29 PM2023-06-18T16:29:38+5:302023-06-18T16:29:38+5:30
Ashadhi Wari: लाडक्या विठुरायाला डोळे भरून पाहण्यासाठी पंढरीच्या दिशेने निघालेला वैष्णवांचा मेळा रविवारी दुपारी सातारा जिल्ह्यात आला. या वारीतील महत्त्वाचे असलेल्या माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले.
- संतोष खरात
लोणंद : लाडक्या विठुरायाला डोळे भरून पाहण्यासाठी पंढरीच्या दिशेने निघालेला वैष्णवांचा मेळा रविवारी दुपारी सातारा जिल्ह्यात आला. या वारीतील महत्त्वाचे असलेल्या माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले.
वाल्हे मुक्कामानंतर सकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने निरेकडे प्रस्थान झाले. दुपारच्या न्याहारीनंतर सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी माऊलींच्या पादुकांचे नीरा दत्तघाटावर स्नान घालण्यात आले. माऊलींच्या पादुकांना नीरा नदीवर स्नान घालण्याची ७०० वर्षांची परंपरा आहे. त्यानुसार रविवारी दुपारी दीडच्या सुमारास माऊलींची पालखी नीरा नदीवरील दत्तघाटावर आली. त्यानंतर अवघा दत्तघाट परिसर माऊलींच्या जयघोषाने दुमदुमला. यावेळी हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. हा सोहळा सुरू असताना वारकऱ्यांच्या आनंदाला उधान आले होते.
हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ मृदंगांच्या गजरात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान करून संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे दुपारी मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात आगमन झाले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पाडेगाव येथे सातारा जिल्ह्यात पालखी सोहळ्याने प्रवेश करताच सातारा जिल्ह्याच्या वतीने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, खंडाळ्याचे तहसीलदार अनिल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, विराज शिंदे, माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, लोणंदचे उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील, खंडाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सरफराज बागवान, तारीक बागवान, पाडेगावचे सरपंच यांनी स्वागत केले.
प्रथमच सशस्त्र सलामी
यावेळी प्रथमच सातारा पोलिस दलातर्फे माऊलींच्या सशस्त्र सलामी देण्यात आली. जिल्हा पोलिस बँड पथकाच्या वतीने विठ्ठल विठ्ठलची धून सादर करून माऊलींना संगीतमय सलामी देण्यात आली.
हरिभजनात तल्लीन
नीरा नदीतील स्नानाने ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने जिल्ह्यात प्रवेश केला. पाडेगाव येथे लाखो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामात, हरिभजनात तल्लीन होऊन वारकरी नाचत होते. भाविकांच्या प्रचंड उत्साहाने माऊलींचा पालखी सोहळा भक्तरसात चिंब होऊन गेला होता.