Satara: रयत कारखान्याच्या बगॅसला भीषण आग, बॉयलरसह साहित्य जळाले, लाखो रुपयांचे नुकसान
By संजय पाटील | Published: April 8, 2024 09:40 AM2024-04-08T09:40:02+5:302024-04-08T09:40:36+5:30
Satara News: कऱ्हाड तालुक्यातील म्हासोली-शेवाळेवाडी येथील डोंगराला लागलेल्या आगीमुळे रयत कारखान्याचा बगॅस पेटला. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. आगीत बॉयलर, लाकडे व इतर साहित्य जळाले.
- संजय पाटील
कऱ्हाड : तालुक्यातील म्हासोली-शेवाळेवाडी येथील डोंगराला लागलेल्या आगीमुळे रयत कारखान्याचा बगॅस पेटला. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. आगीत बॉयलर, लाकडे व इतर साहित्य जळाले. अग्निशमन दलाने सुमारे चार तास शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. आगीमध्ये कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, म्हासोली-शेवाळेवाडी येथे रयत कारखाना कार्यरत आहे. या कारखान्याच्या बगॅसला रविवारी रात्री अचानक आग लागली. ही घटना निदर्शनास येताच कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर तातडीने अग्निशमक दलाला त्याठिकाणी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने सुमारे चार तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत कारखान्याचा बॉयलर, लाकडे तसेच इतर साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
कारखान्यानजीक असलेल्या डोंगराला वणवा लागल्यानंतर ती आग कारखान्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर बगॅसने पेट घेतल्याची शक्यता घटनास्थळी वर्तविण्यात येत होती. मात्र आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.