Satara News: धार्मिक कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा; एकाचा मृत्यू, २४ जणांना उलटी-जुलाबचा त्रास
By नितीन काळेल | Published: June 12, 2023 07:03 PM2023-06-12T19:03:01+5:302023-06-12T19:03:16+5:30
खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
सातारा/ कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील वहागाव येथे धार्मिक कार्यक्रमातील जेवणातून २४ जणांना विषबाधा झाली. त्यामुळे उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊन लागल्याने संबंधितांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, एकाचा मृत्यू झाला. तर या प्रकारानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रमोद शिर्के यांनी गावात भेट देऊन माहिती घेतली. सध्या सर्व स्थिती आटोक्यात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वहागाव येथे ९ जून रोजी धार्मिक कार्यक्रम होता. यानिमित्ताने जेवणाचा बेत करण्यात आलेला. गावातील व बाहेरील असे मिळून एकूण ३५ जणांनी येथील जेवण केले होते. मात्र, त्यातील २४ लोकांना जेवणानंतर उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना कऱ्हाड आणि विटा (जि. सांगली) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले. यामधील बहुतांशी नागरिकांची प्रकृती चांगली होऊ लागली आहे. तर एकास जास्त त्रास होत असल्याने कऱ्हाडमधीलच खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, संबंधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी आरोग्य विभागास सूचना केली. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रमोद शिर्के यांनी वहागावला भेट दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भगवान मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुनील चव्हाण उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला सूचना केली. त्यानंतर उंब्रजच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने गावात घरोघरी भेट देऊन माहिती घेतली. तर घटनास्थळावरुन भाकरी, तांदूळ आदीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तर संबंधित घरातील ५ लोकांचे स्टुल सॅम्पल आणि पाणी नमुने घेऊन जैविक तपासणीसाठी ते जिल्हा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
नागरिकांना आवाहन आहे की सध्या उन्हाळ्यासारखी स्थिती असून शिळे अन्न पदाऱ्थ खाऊ नयेत. पाणी उकळून प्यावे. यात्रा किंवा धार्मिक कार्यक्रमात जेवण करताना सर्व प्रकारची काळजी घेण्याची गरज आहे. - डाॅ. प्रमोद शिर्के, जिल्हा आरोग्य अधिकारी
वहगावात अन्नातून विषबाधा झाली होती. तेथील परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आहे. बाधित लोकांवर संपूर्ण आैषधोपचार करण्यात येत आहेत. आरोग्य विभागाचे पथक कार्यरत असून गावात सर्वेक्षण करण्यात येत आहे. - ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी