सातारा : रात्रीच्या वेळेत वाहनांवर पडतायत दगड, शाहूपुरीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 03:54 PM2018-06-27T15:54:04+5:302018-06-27T15:57:05+5:30
सातारा येथील शाहूपुरी परिसरात रात्रीच्यावेळी पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरु आहे. रात्री-अपरात्री समाजकंटकांकडून वाहनांवर दगड टाकला जात असल्याने वाहनधारक तणावाखाली आहेत.
सातारा : येथील शाहूपुरी परिसरात रात्रीच्यावेळी पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरु आहे. रात्री-अपरात्री समाजकंटकांकडून वाहनांवर दगड टाकला जात असल्याने वाहनधारक तणावाखाली आहेत.
शहरालगतच्या शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेकांनी या परिसरातच बंगले बांधले आहेत. कॉलनींतील रस्तेही प्रशस्त असल्याने लोक रात्रीच्यावेळी रस्त्याकडेला अथवा मोकळ्या जागांवर आपली वाहने पार्क करतात.
वाहनांच्या काचा फुटत असल्याने जयविजय सोसायटी, महालक्ष्मी सोसायटी, गडकर आळी, सर्वोदय नगर, मोळाचा ओढा, सैदापूर फाटा या परिसरातील वाहनधारक प्रचंड तणावाखाली आहेत.
काही दिवसांपासून मात्र अनेक कॉलन्यांमध्ये वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार काही समाजकंटकांकडून सुरु आहे. मध्यरात्री स्थानिक रहिवाशी झोपी गेल्यानंतर काही जण वाहनांवर दगड टाकत आहेत. अनेक वाहनांच्या काचा फुटत आहेत.
अनेक जणांनी आपल्या स्वत:च्या जागेत पार्क केलेल्या वाहनांवरही दगड टाकले जात आहेत. वाहनांच्या काचा फुटून हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याने वाहनधारकांनी होणाऱ्या खर्चाची धास्ती घेतली आहे. वाहनधारकांना वेठीस धरणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.