सातारा : नववी पास डॉक्टरकडून गर्भलिंग तपासणी, सातारा जिल्ह्यात आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:10 PM2018-06-19T13:10:16+5:302018-06-19T13:10:16+5:30
केवळ नववी पास असूनही डॉक्टरच्या थाटात गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या तरुणाला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीला तीन मुली असून माण-खटावच्या दुष्काळी भागात मोटारसायकलवर फिरून तो हा गोरख धंदा करायचा.
सातारा : केवळ नववी पास असूनही डॉक्टरच्या थाटात गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या तरुणाला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीला तीन मुली असून माण-खटावच्या दुष्काळी भागात मोटारसायकलवर फिरून तो हा गोरख धंदा करायचा.
याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील औंध परिसरात नाथा सहदेव खाडे (वय ३१, रा. धामणी, पो. पिंपरी, ता. माण) हा मोटारसायकलीवर पाठीमागे पिवळ््या रंगाची मोठी सॅक घेऊन संशयितरित्या फिरत होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे यांच्या पथकाने ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोना स्टार कंपनीचे सोनोग्राफी मशीन, मोटारसायकल (एमएच ११ सीएन ५९०६) आणि मोबाईल फोन असा एकूण २ लाख २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. गर्भलिंग निदान करण्यासाठी तो दुष्काळी भागातील गावोगावी मोटारसायकलवर मशीन घेऊन फिरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक करून मुद्देमाल ताब्यात घेतला.
तो केवळ नववी पास असून त्याच्याकडे कोणतीही वैद्यकिय पदवी नाही. तरीही मशीनद्वारे गर्भवती महिलांची गर्भ लिंग निदान तपासणी करत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.
या दुष्काळी भागातील एका डॉक्टरकडे काम करत असताना त्याने निदानाची तांत्रिक माहिती घेतली होती. दरम्यान, तपासणीनंतर गर्भपातासारखे प्रकार केले गेले काय, याचाही शोध पोलीस घेत आहेत.