सातारा :हमरस्ता नव्हे ... ही तर शेतातली पायवाट, रांजणी पाटी-पळशी रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:52 PM2017-12-23T16:52:11+5:302017-12-23T16:56:30+5:30
माण तालुक्यातील पळशी येथील रांजणीपाटी ते पळशी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावरील खडी उखडून रस्ता खराब झाला आहे. तर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अगदीच बिकट असते. या रस्त्यावरून वाहन चालविणेच काय तर चालणेही अवघड झाले आहे.
पळशी : माण तालुक्यातील पळशी येथील रांजणीपाटी ते पळशी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावरील खडी उखडून रस्ता खराब झाला आहे. तर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अगदीच बिकट असते. या रस्त्यावरून वाहन चालविणेच काय तर चालणेही अवघड झाले आहे. गेल्या २८ वर्षांपासून रस्त्याची अवस्था जैसे थे असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
वाहनचालकांनी काही ठिकाणी रस्त्यालगतच्या मोकळ्या शेतातूनच रहदारी सुरू केली आहे. परिणामी शेतकरी व वाहनचालक यांच्यामध्ये नेहमीच शाब्दिक चकमकी उडताना दिसत आहेत. जवळपास गेल्या २८ वर्षांपासून रस्त्याची अवस्था जैसे थे असून, आता तरी हा वनवास संपणार का? असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
पळशी-रांजणीपाटी हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या रस्त्यावर कधीच डांबर पडले नाही. जवळपास १९७७ च्या सुमारास हा रस्ता तयार करण्यात आला होता.त्यानंतर या रस्त्यावर ना कधी डांबर पडले, ना रस्त्याची कधी दुरुस्ती करण्यात आली, असे ग्रामस्थ सांगत आहेत.
या परिसरासह रांजणी, भालवडी, पुजारमळा, बागेचा मळा येथून दर पोर्णिमेला गोंदवले येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर जात असतात. गोंदवले येथे जाण्यासाठी हाच नजीकचा मार्ग असून, रस्त्याची दुर्दशा झाल्याने भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पळशी येथे शिक्षणासाठीही विद्यार्थी याच रस्त्याने जातात. विद्यार्थ्यांनाही रोज याच रस्त्याच्या जाचातून जावे लागत आहे. तरी संबंधित विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
रात्रीच्या वेळी घडतात अपघात
रांजणीपाटी-पळशी रस्त्यावरील खड्ड्यात पावसाळ्यामध्ये पाणी साठून राहिल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे या मार्गावर नेहमीच लहान-मोठे अपघात घडत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
विद्यार्थी संख्या घटली
पळशी येथे पहिली ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे आणि या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. पूर्वी या परिसरातून विद्यार्थ्यांचा लोंढाच्या लोंढा पळशी शाळेत जात होता. याच शाळांमधून शिक्षण घेऊन पळशीत शेकडो अधिकारी तयार झाले; पण रस्त्याच्या दुर्दशेमुळे माळीखोरा येथील विद्यार्थी दुसऱ्या गावात मार्डी येथे शिक्षणासाठी जात आहेत.