सातारा : सहा वाहनांच्या विचित्र अपघातात एक ठार; एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:16 PM2018-05-17T18:16:42+5:302018-05-17T18:20:33+5:30
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील इंदोली फाटा येथे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एक वृद्ध ठार झाला असून, एकजण जखमी आहे.
उंब्रज (सातारा) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील इंदोली फाटा येथे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एक वृद्ध ठार झाला असून, एकजण जखमी आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, उंब्रज परिसरात गुरुवारी दुपारी पाऊस पडत होता. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून कोल्हापूरकडे जाण्याच्या लेनवर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरला डंपरची धडक बसली. या धडकेनंतर गॅसची गळती सुरू झाली.
यावेळी चालकाने तातडीने वरिष्ठाशी संपर्क साधून तात्पुरती गळती बंद केली. याच दरम्यान दुसरा एक टँकर तेथून निघाला होता. त्याही वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने टँकर महामार्गावर फिरला. या टँकरने दोन कार व एका पिकअप जीपला धडक दिली.
यामध्ये पिकअप जीप पलटी झाली. जीपमधील एक वृद्ध जागीच ठार झाला असून, एकजण जखमी झाला. जखमीला तातडीने कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून उंब्रज पोलिसांनी कऱ्हाड येथून अग्निशमन दलाचा बंब बोलावून घेतला.
अपघातानंतर टँकर मार्गस्थ
दरम्यान, अपघातानंतर गळती झालेला टँकर चालक घटनास्थळावरून घेऊन गेला. सुरक्षिततेच्या कारणाने पोलिसांनी हा टँकर ताथवडे टोलनाक्याच्या पुढे अडविला असून, तो रस्त्याच्या कडेला उभा केला.
त्या ठिकाणी अग्निशमन बंब पाठविला आहे. ही गळती थांबल्याची खात्री झाल्यानंतर टँकर पुढे जाऊ दिला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.