साताऱ्यात कांदा महागच<bha>;</bha> चार हजार रुपये क्विंटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:34 AM2021-02-15T04:34:02+5:302021-02-15T04:34:02+5:30
सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली तरी दर टिकून आहे. क्विंटलला चार हजारांपर्यंत दर मिळत ...
सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली तरी दर टिकून आहे. क्विंटलला चार हजारांपर्यंत दर मिळत आहे, तर मंडईत चांगला कांदा ५० रुपयांच्या पुढे आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर बाजार समितीत गवार अन् हिरवी मिरची भाव खात असून कोबी, टोमॅटो अजूनही स्वस्तच आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. पण, सध्या कांद्याची चांगली आवक होत असली तरी दर वाढलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत. बाजार समितीत रविवारी फळभाज्यांची एकूण ६०४ क्विंटलची आवक झाली. यामध्ये कांद्याची २४५ क्विंटलची आवक झाली. क्विंटलला अडीच हजारपासून चार हजारापर्यंत भाव आला, तर वांग्याला दर कमी मिळाल्याचे दिसून आले. १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ८० ते १२० अन् कोबीला २० ते ३० रुपये १० किलोला मिळाले.
पाऊचचा दर वाढला...
मागील काही आठवड्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढलेलेच आहेत. सध्या सूर्यफूल तेल डबा २०३० ते २१३० रुपयांना मिळत आहे. सोयाबीनचा तेल डबा १९५० ते २ हजार, शेंगतेलाचा २१०० ते २३५० आणि पामतेलाचा डबा १७०० ते १७६० रुपयांना मिळू लागलाय, तर एक लिटरच्या खाद्यतेल पाऊचमागे सरासरी चार रुपये वाढ झालेली आहे.
खरबुजाची आवक...
सातारा बाजार समितीत सफरचंद, संत्री, चिक्कू, द्राक्षे, कलिंगड तसेच खरबुजाचीही आवक झाली. कलिंगडाबरोबरच खरबुजाला मागणी वाढल्याचे दिसून आले.
आलं स्वस्तच...
बाजार समितीत कांदा, लसूण, गवार, शेवग्याचा दर टिकून आहे. मात्र, अनेक भाज्यांना दर मिळत नाही. दोडक्याला १० किलोला ३०० ते ३५० रुपये भाव आला. मिरचीला ३०० ते ४५० रुपये, भेंडी ४०० ते ४२०, शेवग्याला १० किलोला ३०० ते ४०० रुपये भाव आला. आले, वाटाणा अजून स्वस्तच आहे.
साताऱ्यातील मंडईत भाज्यांचे दर अजूनही ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. पण, कांद्याचा दर वाढत चालला आहे. चांगला कांदा ६० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे.
- राजाराम यादव, ग्राहक
मागील आठ दिवसांपासून कांद्याला उठाव आहे. त्यामुळे दर वाढत चाललाय. सध्या चार हजारांपर्यंत क्विंटलला दर मिळत आहे, तर बाजारात बसून विकायचा झाला, तर दर वाढून मिळतोय.
- नारायण साळुंखे, शेतकरी
खाद्यतेलाबाबत पाश्चात्य मार्केट तेजीतच आहे. त्यातच भारत देश आयातीवरच बहुतांशी अवलंबून आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर वाढलेलेच आहेत. सध्या १५ किलोच्या डब्यामागे सरासरी ५० ते १०० रुपये वाढ झाली.
- संभाजी आगुंडे, तेल विक्री प्रतिनिधी