सातारा : मान्सूनचा नुसताच वारा; पावसावरच भरवसा सारा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 02:05 PM2018-06-13T14:05:33+5:302018-06-13T14:05:33+5:30
सातारा जिल्ह्यात मान्सूनने वेळेत हजेरी लावली असलीतरी गेल्या दोन दिवसांपासून नुसताच भिरभिर वारा वाहत असल्याने पावसाचे ढग दूर राहिले आहेत. त्यामुळे पहिल्या झालेल्या पावसावर पेरणी करायची का नाही, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी आहेत. तर जमिनीत पुरेशी ओल नसल्याने काही ठिकाणची पेरणी रखडणार असून, पश्चिम भागात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने विश्रांती घेतली आहे.
सातारा : जिल्ह्यात मान्सूनने वेळेत हजेरी लावली असलीतरी गेल्या दोन दिवसांपासून नुसताच भिरभिर वारा वाहत असल्याने पावसाचे ढग दूर राहिले आहेत. त्यामुळे पहिल्या झालेल्या पावसावर पेरणी करायची का नाही, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी आहेत. तर जमिनीत पुरेशी ओल नसल्याने काही ठिकाणची पेरणी रखडणार असून, पश्चिम भागात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने विश्रांती घेतली आहे.
जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाला वेळेत प्रारंभ झाला असलातरी प्रमुख धरणात सहा दिवसानंतरही पाण्याची आवक सुरू झालेली नाही. तसेच धरण क्षेत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाला असलातरी पुन्हा त्याचे प्रमाण कमी होत आले आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण परिसरात २४ मिलिमीटर पाऊस पडला होता. तर बुधवारी सकाळपर्यंत ११ मिलिमीटर पाऊस झालेला. याचाच अर्थ धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे.
याला कारण म्हणजे गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत वाहत असणारा भिरभिर वारा. यामुळे मान्सूनचे ढग कुठे आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असले तरी एक बाब महत्त्वाची ठरली आहे ती गतवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यातील प्रमुख धरणात अधिक पाणीसाठा आहे. कोयना धरणात तर गतवर्षीपेक्षा दहा टीएमसी साठा अधिक असून, धोम आणि कण्हेरमध्येही पाणीपातळी चांगली आहे.
पावसाचे असे सतत भिरभिरणे सुरू असताना दुष्काळी पूर्व भागात मात्र चिंतेचे ढग दाटून आले आहेत. माण, फलटण, खटाव, कोरेगाव या तालुक्यांत वळवाचा एखादा आणि मान्सूनचा कोठेतरी झालेला पाऊस यावर शेतकरी पेरणी करण्यास धजावणार नाहीत.
सध्या बाजारात बी-बियाणे उपलब्ध झालेले आहेत. पुरेसा पाऊस नसल्याने बियांची खरेदी करावी का नको, या चिंतेत शेतकरी आहेत.